

यवत: राज्यातील शितोळे देशमुख परिवाराच्या पारंपरिक जावळ विधीबाबत राज्य महिला आयोगाकडून झालेल्या अप्रचाराचा तसेच संपूर्ण शितोळे देशमुख कुटुंबाच्या बदनामीचा निषेध नोंदवण्यासाठी निषेध सभा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील संपूर्ण शितोळे देशमुख परिवाराचा भव्य मेळावा रविवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता रोटी(ता दौंड) येथील रोटमलनाथ मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यात पारंपरिक संस्कृती व रूढी परंपरा जपण्याचा निर्धार व्यक्त केला जाणार आहे.
सकल शितोळे परिवाराच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, जावळ विधी ही शेकडो वर्षांपासून चालत आलेली धार्मिक व सांस्कृतिक परंपरा असून त्याचा विपर्यास करून समाजाची बदनामी करण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे.
या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत आपली भूमिका स्पष्ट करावी, या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यासाठी राज्याच्या विविध भागांतून शितोळे देशमुख समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, परंपरा जपण्याचा आणि समाजाच्या सन्मानासाठी एकजुटीचा संदेश देण्याचा संकल्प यावेळी करण्यात येणार आहे.