

वेल्हे : राजगड तालुक्यातील तब्बल 105 शिवकालीन पाणंद रस्ते प्रशासनाने खुले केले असून, याशिवाय 500 हून अधिक नवीन शेत रस्तेही तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीत भर पडणार असल्याचे राजगड तालुका तहसीलदार निवास ढाणे यांनी सांगितले.
राजगड तालुका तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत, शिवकाळापासून सरकारी नकाशात असलेले पाणंद, गाडीवहिवाट व शेत-शिवारांना जोडणारे रस्ते अतिक्रमणमुक्त करून प्रशासनाने खुले केले आहेत. यामुळे सह्याद्रीच्या दुर्गम डोंगररांगा आणि कडे-कपाऱ्यातील शेतशिवारांपर्यंत वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. शेतीमालासह अवजारे व साहित्य वाहतुकीसह शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे.
तहसीलदार निवास ढाणे म्हणाले, ‘राजगड ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राची कर्मभूमी आहे. तालुक्यातील 129 पैकी 108 गावांतील सरकारी नकाशात असलेल्या पाणंद व इतर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली. स्थानिक ग््राामस्थ व प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून 105 पाणंद रस्ते खुले करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसह रहिवाशांना शेतात, शिवारात ये-जा करण्यासाठी बारमाही रस्ते उपलब्ध झाले आहेत. यामुळे शेती व शेतीपूरक उद्योगांना चालना मिळाली असून, राष्ट्रीय संपत्तीत भर पडणार आहे.’
पानशेत रस्त्यावरील ओसाडे येथे अनेक वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणांना जमीनदोस्त करून शिवकालीन गावपाणंद रस्ता खुले करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सीमांकन करण्यात आले असून देशी वृक्षांची लागवडही करण्यात आली आहे. या रस्त्यांचे लोकार्पण तहसीलदार ढाणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सचिन पिलाणे, ओसाडे निगडे शेती सहकारी सोसायटीचे सचिव कैलास निवंगुणे, नटवर जावळकर, उल्हास कोकाटे आदी उपस्थित होते.
निवंगुणे म्हणाले, ‘प्रशासनाने अशक्य वाटणारे काम काही तासांतच पूर्ण केले. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची अतिक्रमणे दूर झाली. सरकारी रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी रस्त्यांना सरकारी क्रमांकही दिले आहेत. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी रस्ते उपलब्ध झाले आहेत.’
ओसाडे येथे अतिक्रमणे जमीनदोस्त करून खुले केलेल्या शिवकालीन गाव पाणंद रस्त्याचे लोकार्पण करताना निवास ढाणे, कैलास निवंगुणे व इतर.