

नारायणगाव : शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाचे संशोधन आणि कृषी ज्ञानाची दारे उघडणारा ''ग्लोबल कृषी महोत्सव २०२६'' येत्या ८ ते ११ जानेवारीदरम्यान नारायणगाव येथे रंगणार आहे. ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित या भव्य प्रदर्शनाच्या महामंडपाचे भूमिपूजन ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त प्रकाश पाटे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२६) पार पडले.
या महोत्सवामुळे जुन्नर-आंबेगाव पट्ट्यासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रगतीचे एक नवीन पर्व सुरू होणार आहे. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी, “हा ग्लोबल कृषी महोत्सव शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि बाजारपेठेशी थेट जोडणारा मैलाचा दगड ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला. ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त प्रकाश मामा पाटे, मोनिकाताई मेहेर, अध्यक्ष सुजित खैरे, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, कार्यवाह रवींद्र पारगावकर, कार्यकारिणी सदस्य सोमजीभाई पटेल, आल्हाट खैरे, अरविंद भाऊ मेहेर, रत्नदीप भार्विरकर, डॉ. संदीप डोळे, ऋषिकेश मेहेर, देवेंद्र बनकर, नीलेश पाटे, केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, शास्त्रज्ञ राहुल घाडगे, योगेश यादव, भरत टेमकर, डॉ. दत्तात्रय यादव, निवेदिता शेटे, डॉ. सुयोग खोसे, वैभव शिंदे, धनेश पडवळ, रूपेश कोळेकर, नितीन होनराव, संतोष प-हाड आदी उपस्थित होते.
ग्लोबल कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अपर मुख्य सचिव (कृषी) विकास रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आयसीएआर अटारी पुणे संचालक डॉ. एस. के. रॉय उपस्थित राहणार आहेत. समारोप प्रसंगी खा. सुप्रिया सुळे, खा. डॉ. अमोल कोल्हे आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. या प्रसंगी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, महिला शेतकरी, कृषी उद्योजक, नावीन्यपूर्ण कार्य करणारे कृषी पत्रकार, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे कृषी विस्तारक यांना 'ग्रामोन्नती कृषी सन्मान' देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये--
* सुमारे ५० एकर क्षेत्रावर शिवार फेरी
* राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची ५५ हून अधिक पीक प्रात्यक्षिके
* नैसर्गिक शेतीचे पंचसूत्री आणि विविध भाजीपला पिकांची लागवड
* परसबागेतील ४० प्रकारचा विषमुक्त भाजीपाला
* मिलेट उद्यानात १२ प्रकारचे मिलेट प्रकार
* पंचतारांकित हॉटेलसाठी चायनीज व विदेशी-----
* २५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
* नवीन खते, औषधे, बियाणे, यंत्रे, अवजारे, उपकरणे
* करार शेती, शेतमाल विक्री, एफपीओ व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग
* कांदा, टोमॅटो, भाजीपाला, फळपिके, शेळीपालन व जोडधंदे
* मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग, उत्पादन ते विक्री साखळी व धान्य महोत्सव
* शेतीमध्ये एआयचा वापर आणि आर्थिक विकासाच्या संधींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
या प्रदर्शनात हवामान आधारित भाजीपाला व्यवस्थापन, ऊस व केळी पिकातील एआय आधारित शेती व नैसर्गिक शेती, देशी गोवंश याबाबत चर्चासत्र, शेळीपालन, प्रक्रिया उद्योग, कांदा-टोमॅटो मूल्यवर्धन आणि उत्पादन ते विक्री या साखळीवर विशेष परिसंवाद होणार आहे. हायटेक शेती तंत्रज्ञान आणि करार शेती यावरही सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. एक लाखाहून अधिक शेतकरी या प्रदर्शनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या महोत्सवाला भारतीय कृषी संशोधन परिषद, नाबार्ड, आत्मा कृषी विभाग, जिल्हा सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, भीमाशंकर व विघ्नहर सहकारी साखर कारखाना, पुणे जिल्हा परिषद, बँक ऑफ इंडिया यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. महोत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नेक्सस इव्हेंट यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी प्रा. राहुल घाडगे (९४२२०८००११) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केव्हीकेचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी केले आहे.
"नारायणगावच्या या भूमीत एक लाखाहून अधिक शेतकरी कृषी तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवतील. शेतीला एआय तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती उद्योगाला भरारी देण्यासाठी हे प्रदर्शन मैलाचा दगड ठरेल."
कृषिरत्न अनिल मेहेर, अध्यक्ष, कृषी विज्ञान केंद्र.