

Congress, UBT Sena, Sharad Pawar Group Explore Pune Alliance: पुण्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमधील युती सध्या अडचणीत असल्याचं चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात पुणे महापालिकेसाठी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र जागावाटपावर एकमत न झाल्याने ही युती फिसकटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवार गटाकडून अपेक्षित आणि सन्मानजनक जागा मिळत नसल्याने शरद पवार यांनी आता पुन्हा काँग्रेससोबत चर्चा सुरू केली आहे. पुण्यात एका गुप्त ठिकाणी महाविकास आघाडीची (मविआ) बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीत काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची शिवसेना यांच्यात संभाव्य युतीवर चर्चा करण्यात आली.
विशेष म्हणजे, पुण्यातील शांताई हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर झालेल्या या बैठकीला तेच स्थानिक नेते उपस्थित होते, जे गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार गटासोबत चर्चेसाठी गेले होते. शरद पवार गटाकडून अंकुष काकडे आणि विशाल तांबे उपस्थित होते, तर काँग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह अन्य नेते बैठकीत सहभागी झाले होते. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून वसंत मोरे यांचीही उपस्थिती होती.
या बैठकीत पुण्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवू शकते का, यावर प्राथमिक चर्चा झाली असल्याचं समजतं. दुसरीकडे, अजित पवार गटाकडून शिंदे गटाच्या शिवसेनेसह युतीची शक्यता तपासली जात असल्याचीही चर्चा आहे. भाजपकडून सन्मानजनक जागा दिल्या जात नसल्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याचं उघडपणे समोर आलं आहे.
या नाराजीचा भाग म्हणून शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी थेट भूमिका घेत, अपेक्षित जागा न मिळाल्यास मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात उतरवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर भाजपवर दबाव टाकण्यासाठी आंदोलनाचाही मार्ग अवलंबण्यात आला असून, नीलम गोरे यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
एकूणच पुण्यातील महापालिका निवडणूक जवळ येत असताना, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत. कोण कोणासोबत जाणार, युती कुठे जुळणार आणि कुठे तुटणार, हे चित्र अजूनही स्पष्ट नसल्याने पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.