

अक्षय देवडे
पाटस : दौंड तालुक्यातील पाटस हे गाव एकेकाळी स्वच्छता, शिस्त आणि नियोजनासाठी ओळखले जायचे. मात्र, आज हेच गाव कचऱ्याच्या गंभीर समस्येने वेढले गेले आहे. गावातील मुख्य चौक, अंतर्गत रस्ते, शाळा, सार्वजनिक ठिकाणे तसेच नाले कचऱ्याने भरलेले असून दुर्गंधी, अस्वच्छता, आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत.
घरगुती कचरा, प्लास्टिक, हॉटेलमधील उरलेले अन्न व मांसाहाराचा कचरा थेट रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत टाकला जात आहे. ठोस कचरासंकलन व्यवस्था नसल्याने कचरा जिथे तिथे साचतो. पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा अडकल्याने पाणी तुंबते आणि डासांचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढत आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊनही ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, काही सुज्ञ नागरिक स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी असल्याचे मत मांडत आहेत.
ग्रामपंचायतीची कचरागाडी आठवड्यातून दोन निवासांनंतर येते. यामुळे नागरिकांनी कचरा कोठे टाकण्याचा हा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीची कचरा गाडी दररोज येणे आवश्यक आहे. यामुळे कचरा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
सचिन आव्हाड, नागरिक, पाटस
नियमित कचराउचल व्यवस्था नाही
नाल्यांमध्ये कचरा साचून पाणी तुंबते
दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढतो
आरोग्यावर गंभीर परिणाम
दोन दिवसांत ग्रामपंचायतची बैठक होणार असून, त्या बैठकीत कचऱ्याचा प्रश्न मांडून योग्य उपाययोजना केल्या जातील.
भालचंद्र काळे, ग्रामविकास अधिकारी, पाटस