

निमोणे: राज्यात कुठेही दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास एक होऊ... पण शिरूर तालुक्यात नको, तो बाबा एकदा का परत चिकटला, की मग आपलं काय खरं नाही, असे म्हणणारे देखील अनेक जण आहेत. आता या दोन राष्ट्रवादींचे मनोमिलन होणार नाही, हे कानी पडताच अनेक जणांनी अखेर देवानं आपलं गाऱ्हाणं ऐकलं...! असे म्हणत सुटकेचा नि:श्वास सोडला.
राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर शिरूर तालुक्यात अनेकांनी आपापली मांड व्यवस्थित बसवली. त्यामुळेच की काय या दोन गटांचे मनोमिलन पुन्हा नको, अशी अनेकांनी खुणगाठ बांधली होती. मागील दोन-चार दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेासची आघाडी होणार आणि पुणे महानगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती एकत्र लढणार अशा पद्धतीच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता. शरद पवार असो की अजित पवार, दोन्ही राष्ट्रवादींतील कार्यकर्ते या नेतृत्वावर प्रेम करतात. मात्र, स्थानिक राजकारणात ते तिकडे म्हणून आम्ही इकडे हेच चित्र आहे.
एकत्र राष्ट्रवादी काँग््रेास असताना शिरूर तालुक्याच्या राष्ट्रवादीचे हायकमांड हे माजी आमदार अशोक पवार होते. अशोक पवारांच्या मेहरबानीमुळेच अनेकांना विविध संस्थांमध्ये पदाधिकारी किंवा पक्षात काम करण्याची संधी मिळाली. ’अशोक पवार सांगतील ते धोरण व बांधील ते तोरण’ अशीच परिस्थिती असल्यामुळे पक्षात राहून वेगळं काहीतरी मत मांडायची कुणाचीच हिम्मत होत नव्हती. मात्र, राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अशोक पवारांनी शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारलं आणि मग अनेकांनी अजितदादांच्या जहाजात आसरा घेतला.
विधानसभेला अशोक पवारांचा पराभव झाल्यानंतर आणि दादा गट सत्तेत गेल्यानंतर अजितदादा गटातील सगळ्याच पदाधिकाऱ्यांना ’झाले मोकळे आकाश’ अशीच परिस्थिती निर्माण झाली. खरेदी-विक्री संघात मजबूत पकड बसवली, शिरूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष घड्याळाच्या चिन्हावर निवडून आला, सगळं काही सुरळीत सुरू असतानाच माशी शिंकावी अशी बातमी येऊन धडकली.
दोन राष्ट्रवादी एकत्र येणार... अजून आपल्या नेतृत्वाचा खुंटा मजबूत रोवला नसताना हे काय पुढे वाढून ठेवले... राज्यात काही घडो, पण आपल्या तालुक्यात एकत्र नको... तो बाबा जर परत चिकटला तर आपलं काय खरं नाही...आणि अशाच वातावरणात चर्चा फिस्कटली, अशी माहिती बाहेर आली. त्यामुळेच हुश्श...देवाने गाऱ्हाणं ऐकलं रे बाबा..... हीच चर्चा दबक्या आवाजात सर्वत्र सुरू झाली आहे.