

काटेवाडी: ढेकळवाडी (ता. बारामती) येथील ओढ्यावरील पुलाचे काम सुरू झाल्याने ग््राामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या पुलासाठी जवळपास 52.50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
पावसाळा सुरू झाला की ढेकळवाडीकरांचा जीव अक्षरशः टांगणीला लागतो. पावसाळ्यात ओढ्याला येणारा महापूर शेतकरी, शाळकरी मुले, नागरिक तसेच वाहतुकीसाठी मोठा धोका निर्माण करतो. अनेकदा पाणी पुलावरून वाहू लागल्याने गावांचा इतरांशी संपर्क तुटणे, शेतीचे नुकसान आणि जीवितास धोका अशा घटना घडत होत्या.
या गंभीर समस्येची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. केवळ तात्पुरत्या उपायांवर न थांबता त्यांनी थेट मुळावर घाव घातला. पाहणीदरम्यान ओढ्याची लांबी-रुंदी, पाण्याचा वेग तसेच सध्याच्या पुलाची अपुरी उंची व रुंदी लक्षात घेऊन नवीन व सक्षम पुलाच्या उभारणीसाठी तातडीचे आदेश देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच थेट सूचना देत प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
त्याच निर्णयाचा परिणाम म्हणून ढेकळवाडी ओढ्यावरील पुलाच्या रुंदी-उंचीसह मजबुतीकरण व नव्या बांधकामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सुमारे 52.50 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम तातडीने सुरू केले आहे. पुलाचे काम वेगाने हाती घेण्यात आल्याने पावसाळ्यातील महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, ग््राामस्थांना दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांचा संपर्क कायम राहणार असल्याने शेतीचे नुकसान टळणार आहे, तसेच विद्यार्थ्यांना व नागरिकांची सोय होणार आहे. या कामामुळे ढेकळवाडी व परिसरातील ग््राामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले.