

मंचर: थंडीचा कडाका वाढल्याने नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन मोठे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यातून मोठ्या समस्या टाळल्या जातील, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
हिवाळ्याची तीवता वाढत असताना नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. थंडीमुळे सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, छातीत जडपणा, सांधेदुखी तसेच त्वचेचे आजार वाढताना दिसत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
थंडीच्या दिवसांत शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. सकाळी व रात्री थंड हवामानात बाहेर जाताना उबदार कपडे घालणे आवश्यक आहे. गरम पाणी पिणे, कोमट पाण्याने आंघोळ करणे आणि थंड पदार्थ टाळणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सूप, काढे यांचा समावेश करावा. तेलकट, जंक फूड तसेच थंड पेये टाळावीत. त्वचा कोरडी पडू नये म्हणून तेल किंवा मॉइश्चरायझरचा वापर करावा. घरात स्वच्छता ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे आणि आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
डॉ. आशिष चव्हाण, वैद्यकीय तज्ज्ञ पारगाव-शिंगवे
हिवाळ्यात थंडीमुळे श्वसनाचे व सांधेदुखीचे आजार वाढतात. उबदार कपडे, गरम पाणी, संतुलित आहार व वेळेवर उपचार केल्यास बहुतांश आजार टाळता येतात, थोडी काळजी आणि जागरूकता ठेवल्यास हिवाळा आरोग्यदायी आणि सुरक्षितरीत्या पार पाडता येईल.
डॉ. विनायक खेडकर, वैद्यकीय तज्ज्ञ मंचर