

वाघोली: पुणे शहरासह महाराष्ट्रातील विविध भागांत पाकिस्तानमधील शहरांच्या नावाने, विशेषतः ‘कराची’ या नावाखाली सुरू असलेल्या हॉटेल्स, मिठाई दुकाने व अन्य व्यावसायिक आस्थापनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख तथा सर्वोदय ग््रुापचे अध्यक्ष ओंकार तुपे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाकिस्तानी शहरांची नावे वापरणाऱ्या आस्थापनांची वाढती संख्या ही देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावणारी व असंवेदनशील असल्याचे नमूद केले आहे. पाकिस्तानने अनेक वर्षे भारतविरोधी कारवाया व दहशतवादाला पाठिंबा दिला असून, यामध्ये असंख्य निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून भारतीय जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. अशा देशातील शहरांची नावे व्यवसायासाठी वापरणे हे शहीद जवानांच्या त्यागाचा अपमान असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
प्रत्येक नागरिकाला व्यवसाय करण्याचा अधिकार असला, तरी शत्रू राष्ट्राशी संबंधित शहरांची नावे व्यावसायिक बँडिंगसाठी वापरणे अयोग्य व आक्षेपार्ह असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे. अशा प्रकारामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून राष्ट्रीय भावना दुखावल्या जाऊ शकतात. निवेदनाद्वारे तुपे यांनी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.
त्यामध्ये पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील पाकिस्तानी शहरांच्या नावावर चालणाऱ्या सर्व व्यावसायिक आस्थापनांना तत्काळ नावे बदलण्याचे आदेश द्यावे, महाराष्ट्र सरकारने अशा नावांवर बंदी घालण्याचे स्पष्ट निर्देश जारी करावे आणि महापालिका, पोलिस प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कायदेशीर कारवाई करावी या मुद्द्यांचा समावेश आहे. प्रशासनाने राष्ट्रीय सन्मान आणि जनभावना लक्षात घेऊन या विषयावर तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी तुपे यांनी केली आहे.
पाकिस्तानने सातत्याने भारताविरोधात दहशतवादाला पाठिंबा दिला आहे. अशा शत्रू राष्ट्रातील शहरांची नावे आपल्या राज्यात व्यावसायिक आस्थापनांना देणे हे शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. प्रत्येकाला व्यवसायाचा अधिकार आहे. मात्र राष्ट्रीय सन्मान आणि जनभावना दुखावणारी नावे वापरणे अयोग्य आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने कठोर निर्णय घ्यावा, अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल.
ओंकार तुपे, उपजिल्हाप्रमुख, युवासेना, पुणे