पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवड शहरात एका सराईत गुन्हेगाराने तीन ठिकाणी हवेत गोळीबार केला. तब्बल सात राउंड फायर केल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ६) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास चिंचवड येथील चाफेकर चौक व लिंक रोडवरील पत्रा शेड आणि पिंपरीतील भाटनगर येथे घडली. शाहरुख शेख असे गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यासोबत आणखी दोन साथीदार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगार शाहरुख शेख मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास रिक्षातून चाफेकर चौक येथे आला. तिथे त्याने हवेमध्ये तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने लिंक रोड वरील पत्रा शेड येथे दोन गोळ्या हवेत झाडल्या. त्यानंतर तो पुढे भाटनगर येथे गेला. भाटनगर मधील एका चौकामध्ये त्याने हवेत दोन गोळ्या झाडल्या. दरम्यान, आरोपीने एकाला सीसीटीव्ही कॅमेरा बंद करण्यासाठी धमकावले. तर एकाचा मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चाफेकर चौक चिंचवड ते भाटनगर पिंपरी यादरम्यान ठीकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला. नागरिकांनी घाबरून जावू नये असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
.हेही वाचा