

पुणे : स्त्रीवादी चळवळीतील ज्येष्ठ लेखिका - कार्यकर्त्या आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या माजी संचालिका डॉ. विद्युत भागवत (वय 76) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी (दि.11) पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी असा परिवार आहे. ज्येष्ठ बालसाहित्यकार स्वर्गीय भा. रा. भागवत यांच्या त्या स्नुषा होत. डॉ. विद्युत भागवत यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.13) अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉ. विद्युत भागवत या स्त्रीवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्त्या होत्या. गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ त्या महाराष्ट्रातील स्त्री, विद्यार्थी आणि शेतकर्यांच्या चळवळीसाठी काम करत होत्या. स्त्रियांविषयीच्या अभ्यासाला स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणून घडविणार्या विचारवंतांच्या यादीत डॉ. भागवत यांचा समावेश होतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या त्या संस्थापक - संचालिका होत्या. त्यांचे स्त्रियांच्या प्रश्नांवरील लिखाण, स्त्रीवादी सिद्धांत आणि सामाजिक इतिहासावरील लिखाण गाजले. विविध भारतीय भाषांमधील लेखिकांचे साहित्य एकत्र आणणार्या ‘विमेन्स रायटिंग इन इंडिया’ या प्रकल्पाच्या त्या संपादक होत्या. हा प्रकल्प भारतातील स्त्रीवादी अभ्यास प्रवासात महत्त्वाचा ठरला. हैदराबाद येथील ‘अन्वेषी’ या स्त्रीवादी संघटनेच्या कार्यालयात झालेल्या या प्रकल्पाचे सुझी थारू आणि के. ललिता यांनी नेतृत्व केले होते.
डॉ. भागवत यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून विपुल लेखन केले. त्यांच्या लिखाणातून सामाजिक चळवळी, मध्ययुगीन आणि आधुनिक महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मांडण्यासह स्त्रीवादी साहित्याचा अभ्यास, स्त्रीवादी विचार आणि सिद्धांत, तसेच स्त्रीवादी अभ्यासशाखेच्या संदर्भाने येणारे प्रश्नही समोर आले आहेत. स्त्रीवादाचा मूळ स्रोत या दृष्टिकोनातून त्यांनी संत कवयित्रींच्या काव्याचाही अभ्यास केला होता. महाराष्ट्रातील लिंगभेदविषयक सामाजिक इतिहासावर त्यांनी सातत्याने लेखन केले होते.
महाराष्ट्रात झालेल्या अनेक सामाजिक चळवळींत सक्रिय सहभाग घेतानाच भागवत यांनी महिलांच्या चळवळींपासून ते दलित, गरीब शेतकर्यांच्या चळवळींचा अभ्यास केला. अनेक भाषांतर प्रकल्पांमध्येही त्यांचा सहभाग होता. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने लिखाण केले. सरकारी आश्रमांत बौद्धिकदृष्ट्या अक्षम स्त्रियांची संततिनियमन शस्त्रक्रिया केली जाते, या प्रश्नाची गंभीर दखल घेत त्यांनी पुस्तकी ज्ञान आणि चळवळ यातील तफावत दूर करण्याचे प्रयत्न केले होते. ‘स्त्री प्रश्नाची वाटचाल’ या पुस्तकाच्या लेखनासाठी त्यांना समाजविज्ञान कोश पुरस्कार मिळाला होता. त्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र सारस्वत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- ‘स्त्री प्रश्नाची वाटचाल’
- ‘मानववंश शास्त्रातील लिंगभावाची शोधमोहीम’
- ‘वाढत्या मूलत्त्ववादाला शह : सुसंवादी लोकशाहीच्या दिशेने’ (लेखमालेचे संपादन)
- ‘फेमिनिस्ट सोशल थॉट्स’
- ‘आरपारावलोकिता’ (कादंबरी)