Sassoon drug Case : ‘अर्थ’कारणातील वसुलीदार मध्यस्थ ‘हिटलिस्ट’वर!

Sassoon drug Case : ‘अर्थ’कारणातील वसुलीदार मध्यस्थ ‘हिटलिस्ट’वर!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून मध्यस्थाची भूमिका निभावणार्‍या व वसुलीच्या 'अर्थ'कारणात पारंगत असलेला चतुर्थ श्रेणी कर्मचारी आता हिटलिस्टवर आला आहे. विशेष म्हणजे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील एखाद्या विभागप्रमुखापेक्षाही या कर्मचार्‍याची चलती जास्त होती. वसुली व इतर गैरव्यवहाराच्या कामात चतुर असलेली किटली (चतुर्थ श्रेणी कर्मचारी) 'चहा'पेक्षा गरम होती, अशी खमंग चर्चा ससूनमध्ये सुरू आहे.

गेल्या तीन वर्षांपैकी पाटील तब्बल 16 महिने ससूनमध्ये अ‍ॅडमिट होता. ससूनमधूनच तो राजरोसपणे ड्रगचा व्यवसाय करीत होता आणि त्याला पोलिस कर्मचार्‍यांसह ससूनमधील कर्मचारी, डॉक्टरही मदत करीत होते. पाटीलला अटक झाल्यावर आता एकेक धागे उलगडत असून, त्याला मदत करणारे ससूनमधील कर्मचारीही अडचणीत येणार असल्याचे बोलले जात आहे.

ससूनमधील संबंधित कर्मचारी गुन्हेगार आणि वरिष्ठांचा मध्यस्थ म्हणून काम करीत असल्याने त्याच्याबद्दल कोणीही अद्याप बोलायला तयार नाही. केवळ ललित पाटील प्रकरणातच नव्हे, तर ससूनमध्ये चालणार्‍या बहुतांश 'अर्थ'कारणामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. दिव्यांग प्रमाणपत्रे काढून देणे, वैद्यकीय बिले मंजूर करणे यांसह अनेक 'टेबलाखालील' कामांमध्ये तो सराईत असल्याची चर्चा आहे.

कर्मचार्‍याची बडदास्त

ससून रुग्णालयातील अनेक प्राध्यापक, विभागप्रमुख दुचाकीवरून रुग्णालयात येतात. दहा-बारा तासांची ड्युटी निभावतात. संबंधित कर्मचारी मात्र आलिशान गाडीतून येत असल्याने अनेकांनी पाहिले आहे. त्याने आपल्या 'अर्थ'कारणाच्या अनुभवातून गाड्या, जमीन अशी भरपूर माया कमावली आहे. ललित पाटील पळून गेल्यानंतर हा कर्मचारी आठ दिवस कामावर न आल्याचे ससूनमधील सूत्रांनी सांगितले. मात्र, वरिष्ठांचा वरदहस्त असल्याने अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

अर्थकारण सांभाळणारी साखळी कार्यरत?

ससून रुग्णालय हे गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण समजले जाते. मात्र, बरेचदा रुग्णांकडे किंवा शासकीय कर्मचार्‍यांकडे कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. अर्थकारण सांभाळणारी एक साखळीच ससूनमध्ये कार्यरत आहे. मात्र, कर्ताकरविता वेगळा आणि त्याच्यासाठी काम करणारा वेगळा, अशा पद्धतीने काम केले जाते. अशा कामांमध्ये हा कर्मचारी 'अत्यंत अनुभवी' असल्याचे समजते. ललित पाटील प्रकरणामध्ये ड्रग माफिया, मंत्री, ससूनमधील वरिष्ठ आणि पोलिस यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून त्याने काम केले आहे. त्यामुळे पाटील प्रकरणाचा तपास योग्य दिशेने झाल्यास या कर्मचार्‍याची गच्छंती होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news