Rohit Pawar : मराठा आरक्षणावर राजकारण करू नका : आमदार रोहित पवार

Rohit Pawar
Rohit Pawar

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणावर सरकारकडून केवळ जाहिरातबाजी आणि शब्द देण्याचे काम सुरू आहे. सरकारच्या समितीची एकही बैठक पार पडलेली नाही. सरकारने मराठा आरक्षणावर राजकारण करू नये, असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी पुण्यात सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ दिलेला आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, अंतरवाली सराटी येथील आंदोलनात लाठीमार करण्यात आला. त्यानंतर सरकारने समिती स्थापन करू, असे सांगून समितीही स्थापन केली. परंतु, समितीची बैठक पार पडलेली नाही. सरकारने वेळाकाढूपणा न करता त्यावर ठोस निर्णय घ्यावा, असा सल्लाही पवार यांनी या वेळी दिला.

अग्निवीरच्या माध्यमातून जवानांमध्ये भेदभाव

अग्निवीर ही योजना आणली, त्याचवेळी विरोध करण्यात आला होता. चार वर्षांसाठी कंत्राटी पध्दतीने भरती करून घेत आहेत. ते योग्य नाही, ही भूमिका घेतली होती. तरीही केंद्राने ही योजना राबवून अनेक युवकांना या योजनेत घेतले. पंजाब आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक जवान शहीद झाला. त्यांचा अंतिम कार्यक्रम करताना कोणतीही मानवंदना देण्यात आलेली नाही. त्यामुळे असा भेदभाव करण्यापेक्षा योग्य सन्मान द्यावा.

आज आशिर्वाद यात्रा

युवा संघर्ष यात्रेची आशिर्वाद यात्रा मंगळवार दि. 24 रोजी सकाळी 8.30 वाजता लाल महाल येथून निघणार असून, टिळक स्मारक येथे समारोप होणार आहे. या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दि. 25 ऑक्टोबर रोजी तुळापूर येथून युवा संघर्ष यात्रेला सुरुवात करून 800 किलोमीटरचा प्रवास करून नागपूर येथे समारोप करणार आहोत. या यात्रेदरम्यान येणार्‍या प्रश्नांचे टिपण करून येणार्‍या अधिवेशनात प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news