पुणे; पुढारी वृत्तसेवा : रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. टिळेकरनगर ते खडीमशिन चौकदरम्यान 24 मीटर रुंदीच्या 300 मीटर रस्त्यासाठी आवश्यक असलेली जागा टीडीआरच्या बदल्यात महापालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी जागामालकाने दर्शविली आहे. त्यामुळे पालिकेने लगेचच सोमवारपासून कामाला सुरुवात केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.
कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी राज्य शासनाकडून 200 कोटी रुपयांचा निधी मिळूनही भूसंपादनाअभावी या रस्त्याचे काम मागील काही वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताच्या घटनांना वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी जागामालक जागा ताब्यात देत नसल्याने रुंदीकरण रखडले होते. त्यात प्रामुख्याने खडी मशीन चौकादरम्यान रस्त्यासाठी लागणारी उद्योजक प्रकाश धारीवाल यांच्या मालकीची 60 गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात आलेली नव्हती. याबाबत धारीवाल यांच्याशी पालिकेने संपर्क साधला असता त्यांनी तातडीने ही जागा देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पालिकेने या जागेचा तडजोडीने ताबा घेण्याची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली.
जागा ताब्यात आल्यानंतर प्रशासनाने सोमवारी तातडीने कामही सुरू केले. या जागेवर लेव्हलिंग करून मुरूम टाकून कान्हा हॉटेल चौक ते खडीमशीन चौक या रस्त्याला पर्यायी मार्ग वापरासाठी तयार करण्यात येणार आहे. यावरून जड वाहतूक सुरू करून जुन्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. उर्वरित जागामालकांसोबतही भूसंपादनासाठी बोलणी सुरू असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामुळे कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणे शक्य होईल, असा विश्वासही ढाकणे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा