

बाळासाहेब ननवरे
निरा: टाळ-मृदंगांचा गजर, पताका घेतलेला वैष्णवांचा मेळा आणि मुखी विठ्ठलनामाचा जयघोष करत 'अवघा रंग एक जाहला'ची अनुभूती देत श्री दत्त घाटावर बुधवारी (दि. १५) दुपारी १.२५ मिनिटांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांना शाही निरास्नान घालण्यात आले. त्यानंतर माउलींच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील प्रवास संपवून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. वारीची परंपरा सुरू करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभूमीत भाविकांनी माउलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
वाल्हेतील मुक्काम आटोपून बुधवारी सकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळ्याने पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. सकाळी ९ वाजता पिंपरे खुर्द विहीर परिसरात सकाळची न्याहरी घेऊन दुपारचा नैवेद्य व विसाव्यासाठी निरा गावात दहा वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. या वेळी शिवाजी चौकात पं. स. सदस्या मोनिका कांबळे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर दुपारी पालखी निरा नदीकाठावरील पालखीतळावर विसावली.
या वेळी परिसरातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात इंद्रायणी, निरा, चंद्रभागातीरावरील स्नानाला अधिक महत्त्व आहे. सुरुवातीला माउलीच्या पादुकांना इंद्रायणीच्या पवित्र तीर्थ स्नान घालण्यात येते. त्यानंतर संपूर्ण सोहळ्याच्या वाटचालीत निरा येथे नदीच्या तीर्थात श्री दत्त घाटावर माउलींच्या पादुकांना पहिल्यांदा शाही स्नान घालण्याची परंपरा आहे. त्यानंतर सोहळ्याच्या प्रवासाचा अर्धा टप्पा पूर्ण होतो. दुपारचा नैवेद्य झाल्यानंतर दुपारी एक वाजता हा सोहळा निरा नदीच्या ब्रिटीशकालीन पुलावरून मार्गस्थ झाला. निरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून माउलींचा रथ दत्त मंदिरासमोर आल्यानंतर माउलींच्या पादुकांना रथामधून बाहेर घेऊन सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.
या वेळी पालखी सोहळाप्रमुख अॅड. राजेंद्र उमाप, आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळामालक राजेंद्र पवार, आरफळकर व मानकऱ्यांच्या उपस्थितीत 'माउली माउली'च्या जयघोषात व टाळ-मृदंगांच्या गजरात माउलींच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. यानंतर पालखी सोहळ्याने बुधवारी दुपारी १.५५ वाजता सातारा जिल्ह्यात प्रवेश केला.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जि.प.चे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत, तेजश्री काकडे, दत्तात्रय चव्हाण, विराज काकडे, राजेश चव्हाण, कांचन निगडे यांच्यासह निरा व परिसरातील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याला निरोप दिला.
निरा नदीतील पादुका स्नानानंतर पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, खंडाळ्याचे तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, पाडेगावचे विजय धायगुडे, रघुनाथ धायगुडे आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात पालखी सोहळा येत असल्याने जिल्हावासीयांमध्ये आनंददायी वातावरण आहे. यंदा चांगला पाऊस पडावा. बळीराजा सुखी व समृद्धी राहु दे असे विठ्ठलचरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली.
मकरंद पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री