

पिंपरखेड: शाळांच्या ५०० मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक विक्रीस बंदी घालण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण होणार आहे. मात्र, एकीकडे एनर्जी ड्रिंकवर निर्बंध घालणारे प्रशासन दुसरीकडे पिंपरखेड येथील शाळेपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर सुरू असलेल्या अधिकृत व अनधिकृत दारू विक्रीकडे दुर्लक्ष का करीत आहे? असा संतप्त सवाल ग्रामस्थ आणि महिलांनी उपस्थित केला आहे.
पिंपरखेड-जांबुत रस्त्यावर सुरू असलेले परमिट रूम व बिअर बार हे श्री दत्त विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत पिंपरखेडने २० ऑक्टोबर २०२१ रोजी ग्रामसभा ठराव क्रमांक ३७ द्वारे संपूर्ण गावात दारूबंदी करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता. असे असतानाही ग्रामसभेच्या निर्णयाला आणि लोकभावनेला डावलून बिअर बारला परवानगी देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शाळेजवळ बिअर बार सुरू असल्याने परिसरात मद्यपींचा वावर वाढला असून, शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थी आणि महिलांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच, परिसरातील काही ढाबे आणि इतर ठिकाणी अवैध दारू विक्रीही सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यामुळे गावातील शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी २२ नोव्हेंबर २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री (पालकमंत्री, पुणे), गृहमंत्री, राज्य उत्पादन शुल्कमंत्री, विभागीय आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी व निवेदने सादर केली होती. त्यानंतर पिंपरखेड ग्रामपंचायतीनेही २३ ऑगस्ट २०२४ रोजी गावात दारूबंदीची मागणी करणारे पत्र संबंधित विभागाला दिले. या निवेदनांवर संबंधित कार्यालयांचे शिक्के आणि स्वाक्षऱ्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
एनर्जी ड्रिंकवर तत्परता; मग बिअर बारवर का नाही?
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासन एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर निर्बंध घालू शकते, तर त्याच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेजवळ सुरू असलेल्या बिअर बार आणि अवैध दारू विक्रीवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न स्थानिक महिलांनी उपस्थित केला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित बिअर बारसह परिसरातील अवैध दारू व्यवसाय तातडीने बंद करून प्रशासनाने प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी पिंपरखेड ग्रामस्थांनी केली आहे.