

सुरेश वाणी
नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे समोर येत आहे. जनावरांसाठी आणि सार्वजनिक हितासाठी राखीव ठेवलेल्या या जमिनींचा मूळ उद्देश धोक्यात आला असून, अनेक ठिकाणी घरे, व्यावसायिक बांधकामे आणि इतर वापर सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे शासनाने विशेष मोहीम राबवून गायरान जमिनी पुन्हा ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी नागरिक आणि पशुपालकांकडून होत आहे.
गावातील जनावरांना चारण्यासाठी आणि सार्वजनिक उपयोगासाठी प्रत्येक गावात काही प्रमाणात गायरान जमीन राखीव ठेवण्यात आलेली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या जमिनींवर टप्प्याटप्प्याने अतिक्रमण वाढत गेले असून, अनेक ठिकाणी गायरानक्षेत्राचे स्वरूपच बदलून गेले आहे.
अनेक गावांमध्ये अतिक्रमणांचे जाळे
येडगाव, हिवरे तर्फे नारायणगाव, ओतूर, आळे या मोठ्या गावांसह इतर अनेक ठिकाणी गायरान जमिनींवर अतिक्रमण झाल्याची चर्चा आहे. जळगाव येथील कैलासनगर परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाल्याचे सांगितले जाते. काही गावांमध्ये शाळा, मंदिरे तसेच इतर सार्वजनिक स्वरूपाची बांधकामेही गायरानक्षेत्रात उभारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राजुरी येथेही काही गायरान जमिनींचा खासगी आणि व्यावसायिक वापर होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
प्रशासनाकडून दुर्लक्ष?
गायरान जमिनींचे संरक्षण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन आणि महसूल विभागावर आहे. ग्रामसेवक आणि तलाठी यांनी नियमित पाहणी करून अतिक्रमण रोखणे अपेक्षित असतानाही अनेक ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष झाल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. वेळेवर सर्वेक्षण आणि कारवाई न झाल्याने अतिक्रमणकर्त्यांचे मनोबल वाढल्याचेही बोलले जात आहे.
विशेष मोहिमेची मागणी
गायरान जमिनींची अचूक मोजणी करून अतिक्रमणांची नोंद घ्यावी, दोषींवर कारवाई करावी आणि सार्वजनिक मालमत्ता पुन्हा शासनाच्या ताब्यात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिक आणि पशुपालकांकडून जोर धरत आहे.
गायरान जमिनीवर अतिक्रमण झाल्यास
परवानगीशिवाय बांधकाम करणे बेकायदेशीर आहे.
महसूल विभाग अतिक्रमण हटवून जमीन पुन्हा ताब्यात घेऊ शकतो.
संबंधितांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
गायरान जमीन कोणत्याही व्यक्तीची खासगी मालमत्ता नसून
ती शासनाची सार्वजनिक मालमत्ता आहे.