

पुणे: पुणे शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून, बंद घरे हेरून चोरट्यांनी अवघ्या काही तासांत तीन ठिकाणी हात साफ केला. सिंहगड रोड, लोहगाव आणि नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनांमध्ये सोन्याचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तूंसह सुमारे अडीच लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला. चोरट्यांनी कुठे कुलूप तोडून, कुठे खिडकीचे गज वाकवून, तर कुठे घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरी केली.
कुलूप तोडून रोकड व दागिन्यांवर डल्ला
सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव बुद्रुक येथे ही घटना घडली. सिद्धेश विठ्ठल मारणे (रा. वेणुकुंज अपार्टमेंट, दांगट पाटीलनगर, वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. १३ जुलै रोजी दुपारी दोन ते रात्री पावणेआठ या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजावरील कडी-कोयंडा व लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील २५ हजार रुपयांची रोकड, सहा मनगटी घड्याळे आणि एक ग्रॅम सोन्याचा नेकलेस असा एकूण ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार तारू करत आहेत.
उघड्या दरवाजाची संधी साधली
नऱ्हे परिसरातील घटनेत माधवी सिकंदर कुमार (रा. सद्गुरू कृपा, नऱ्हे-आंबेगाव रोड, नऱ्हे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ३० जून ते १३ जुलै या कालावधीत घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. स्वयंपाकघरातील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले १ लाख १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार खटावकर करत आहेत.
गज वाकवून रो-हाऊसमध्ये चोरी
लोहगाव येथील प्राईम लोटस सोसायटीतील रो-हाऊसही चोरट्यांनी लक्ष्य केले. सुनील बाबू शेलार (रा. प्राईम लोटस सोसायटी, हरणतळे, लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूच्या स्लायडिंग खिडकीचे लोखंडी गज वाकवून घरात प्रवेश केला. त्यानंतर तिजोरीतील ७९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.