

पुणे : धायरी, नऱ्हे आणि वडगाव बुद्रुक परिसरासाठी तयार करण्यात आलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गंभीर त्रुटी आढळून आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. प्रभाग क्रमांक ३३ धायरी–नऱ्हे–वडगाव बुद्रुकसाठी प्रसिद्ध झालेल्या या यादीत एका कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये नोंदविण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
काही ठिकाणी पतीचे नाव प्रभाग क्रमांक ३३ मध्ये, तर पत्नीचे नाव प्रभाग क्रमांक ३४ मध्ये नोंदविण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर अनेक कुटुंबांमध्ये घरातील काही सदस्य एका प्रभागात, तर उर्वरित सदस्य दुसऱ्या प्रभागात नोंदविले गेल्याचेही आढळून आले आहे. या गोंधळामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी आम आदमी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन सादर करत प्रारुप मतदार यादीतील या गंभीर चुकांची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. या त्रुटींमुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असून, अनेक मतदार प्रत्यक्ष मतदानापासून वंचित राहण्याचा धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
बेनकर यांनी सांगितले की, धायरी गावाची विभागणी प्रभाग क्रमांक ३३ आणि ३४ मध्ये करण्यात आली आहे. ही विभागणी प्रशासनाच्या निर्णयानुसार असली, तरी प्रत्यक्ष मतदार नोंदणी करताना कुटुंबाचा पत्ता, घर क्रमांक आणि वास्तवाचा सखोल विचार न करता नावे वेगवेगळ्या प्रभागात नोंदविण्यात आली आहेत. धायरीसह नऱ्हे आणि वडगाव बुद्रुक परिसरातून अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत.
मतदार यादीतील या त्रुटींमुळे मतदारांना आपल्या मतदान केंद्राचा शोध घेण्यात अडचणी येणार असून, एका घरातील सदस्यांना वेगवेगळ्या प्रभागात आणि वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर जावे लागल्यास मतदानाविषयीचा उत्साह कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी मतदानाचा टक्का घटण्याबरोबरच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वासही डळमळीत होऊ शकतो, त्यामुळे या याद्या दुरुस्त करण्यात याव्या अन्यथा आंदोलनाचा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे.