

पुणे : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली असून 8 लाख 61 हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
पहिली घटना कोथरूड परिसरातील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 7 लाख 61 हजारांचा मुद्देमाल लांबविला. याप्रकरणी चोरट्यांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 65 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कोथरूड भागातील उजवी भुसारी कॉलनी येथील एका सोसायटीत राहायला आहेत. सदनिका बंद करुन नातेवाईकाच्या लग्नासाठी गोवा येथे गेल्या होत्या. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलुप तोडून कपाटातील 60 हजारांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 7 लाख 61 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक मोहन चव्हाण करत आहेत.
दुसरी घटना फुरसुंगी भागात घडली असून चोरट्यांनी सदनिकेत आत प्रवेश करुन 1 लाखाच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या.
याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सदनिका बंद असतांना चोरट्यांनी टेरेसच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर बाथरुमच्या खिडकीची काच काढून बेडरूममध्ये प्रवेश केला आणि कपाटातील 1 लाखांच्या सोन्याचा बांगड्या लंपास केल्याचे फिर्यादेत नमूद केले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक महेश नलावडे करत आहेत.