

शिकापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील सरपंच संदीप ढेरंगे यांच्या कायार्लयाबाहेरून फॉर्च्युनर कार चोरीला गेली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
त्याचे नाव अब्दुल हाफिज अब्दुल अजीज (वय ४४, रा. हकीम कॉलनी, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे आहे. ढेरंगे यांनी १६ ऑक्टोबर रोजी त्यांची एमएच-१२ टीएच-१९७७ ही फॉर्च्युनर कार यशवंतराव डेअरी ऑफिसबाहेर उभी केली होती. पहाटे कार गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ऑफीसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये पहाटे ४ वाजता चोरट्यांनी कारची चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दिली. या बाबत तपास सुरू असताना आरोपी बुलढाणा जिल्ह्यात असल्याची खात्रीलायक माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातील हवालदार जनार्दन शेळके, संजू जाधव, तसेच शिक्रापूर पोलिस ठाण्याचे हवालदार श्रीमंत होनमोजे, जयराज देवकर आणि अमोल नलगे यांनी बुलढाणा गाठत आरोपीला अटक केली.