

पुणे : राज्याच्या राजकारणात येत्या काही महिन्यांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होऊ शकतात, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पुण्यात केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट हीच नेतृत्व बदलाच्या प्रक्रियेची नांदी असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रमिक पत्रकार संघात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना अॅड. आंबेडकर यांनी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर सविस्तर भाष्य केले.
आंबेडकर म्हणाले, भाजपने सुरुवातीला राज्यातील महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचा नारा दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर भाजप नेत्यांच्या वक्तव्यात बदल दिसून येत आहे. या निवडणुका शिंदे यांच्या शिवसेनेसह लढविण्याचे संकेत दिले जात आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की, एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासमीकरणे नव्याने आकार घेत आहेत.
महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला स्वबळाचा नारा मागे घ्यावा लागत असल्याने शिंदे यांची राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे येत्या एक-दोन महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच राहणार नाही, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवरही त्यांनी सूचक भाष्य केले. शरद पवार हे चाणक्य राजकारणी आहेत, याबाबत दुमत नाही. त्यांच्यात झालेली भेट ही केवळ औपचारिक नव्हती, तर त्यामागे ठराविक राजकीय संदेश देण्यात आला आहे, असे आंबेडकर म्हणाले.
वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर बोलताना आंबेडकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्यात ऊस आणि कापूस ही दोन प्रमुख पिके असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. विदर्भातील मुख्यमंत्री असूनही कापूस उत्पादकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा तीव्र होत आहे. हा मुद्दा पुढील काळात अधिक उग्र रूप धारण करू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांबाबत वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करताना आंबेडकर म्हणाले की, नगरपालिका व नगर परिषद निवडणुकांत भाजप वगळता विविध पक्षांशी वंचितने युती व आघाडी केली आहे. याच धर्तीवर आगामी महापालिका निवडणुकाही युती किंवा आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येतील. राज्यभर एकसमान धोरण ठरविणे शक्य नसल्याने स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील. भाजप वगळता डावे-उजवे सर्व पक्ष आमच्यासाठी स्वीकारार्ह असून, पुढे घडणाऱ्या राजकीय घडामोडींनुसार वंचितची भूमिका ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.