

पुणे: शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव जागांच्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेत निवड यादीतील नियमित प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना 23 मेपर्यंत प्रवेशाची संधी दिली होती.
परंतु दिलेल्या मुदतीत अपेक्षित प्रवेश न झाल्यामुळे प्रवेशासाठी येत्या शुक्रवार (दि.29 मे) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, नियमित यादीतील 79 हजार 871 तर प्रतीक्षा यादीतील 9 हजार 683 अशा एकूण 89 हजार 554 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील 8 हजार 701 शाळांतील 1 लाख 14 हजार 826 जागांसाठी 2 लाख 89 हजार 286 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी काढण्यात आलेल्या सोडतीच्या माध्यमातून निवड यादीत 1 लाख 5 हजार 811 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले.
त्यानंतर निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत 8 मे रोजी संपुष्टात आली. दिलेल्या मुदतीत 79 हजार 871 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. प्रतीक्षा यादीत 86 हजार 34 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना 23 मेपर्यंत प्रवेशाची संधी देण्यात आली होती. परंतु, त्यासाठी आता 29 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
25 हजार 272 जागा अद्याप रिक्त
यंदा प्रवेशासाठी 1 लाख 14 हजार 826 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 89 हजार 554 जागांवर प्रवेश निश्चित झाले असल्यामुळे 25 हजार 272 जागा अद्यापही प्रवेशासाठी शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या 29 मेपर्यंत संबंधित रिक्त जागांपैकी काही जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.