

पुणे: महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 तसेच वडगाव शेरी मतदारसंघात 20 मेपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भामा आसखेड प्रकल्पातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याला दुर्गंधी येत आहे. हेच पाणी पिल्यामुळे अनेक भागांत जुलाब, उलट्या आणि पोटाच्या विकारांचे रुग्ण वाढत असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. या परिस्थितीमुळे सुमारे पाच लाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
प्रभाग 2 मधील नागपूर चाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, त्रिदलनगर, टिंगरेनगर, चव्हाण चाळ, कस्तुरबानगर, जेल रोड परिसर तसेच वडगाव शेरी मतदारसंघातील विविध भागांमध्ये ही समस्या तीव असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी नगरसेविका नंदिनी धेंडे आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह प्रभाग दोन आणि चारमधील नगरसेवकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार नोंदवत सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे.
नागरिकांकडून तक्रारी वाढल्यानंतर पाणीपुरवठाप्रमुख नंदकिशोर जगताप, लष्कर झोनप्रमुख केळकर तसेच बंडगार्डन विभागप्रमुख ऐकनाथ गाडेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. याशिवाय भामा आसखेड जलशुद्धीकरण प्रकल्पाचे व्यवस्थापक रामदास तारू यांच्याशीही चर्चा करण्यात आली. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा विभाग आणि विद्युत विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही अधिकारी तांत्रिक अडचणींचा दावा करीत असताना काहींकडून कोणतीही समस्या नसल्याचे सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये संभम आणि संतापाचे वातावरण आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने दूषित पाणीपुरवठा बंद करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव आंदोलन छेडले जाईल.
नंदिनी धेंडे, नगरसेविका