

पुणे: सगळे विद्यार्थी आणि युवा एकत्र आले आणि नीटच्या विद्यार्थ्यांवर जो अन्याय झाला होता, त्याच्या विरोधातला लढा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांसह अंधभक्तांचा अहंकार मोडला असल्याचे मत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या झालेल्या राजीनाम्यानिमित्त जल्लोष आयोजित केला होता. यामध्ये रोहित पवार सहभागी होऊन बोलत होते.
पवार म्हणाले, अभिजित दीपके यांनी आंदोलनात सातत्य ठेवलं आणि त्यांना पाठिंबा वाढत गेला. पोलिसांनी दिल्लीत केलेला लाठीचार्ज आणि त्यानंतर अख्खा देश एक झाला, त्या एकीचा विजय काल आपल्याला पाहायला मिळाला. अभिजित दीपके यांच्यासोबत फोनवरून सतत चर्चा करत होतो. हा लढा कुठलाही राजकीय पक्षांनी लढला नाही सामान्य घरातल्या मुलांनी एकत्रित येऊन लढलेला हा लढा आहे.
भाजप पक्षातले काही नेते आणि त्यांची ट्रोलिंग टीम जी दहा पैशांची आहे ही कशी आहे, याचा अभ्यास मला आहे. जर राजकीय नेते व्यासपीठावर दिसले असते, तर भाजपने आंदोलनाला वेगळा रंग दिला असता, असे मत पवारांनी व्यक्त केले. तुम्ही सगळे भारतीय म्हणून एक आलात. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्ही एक झालात. आता बरेच लोक रस्त्यावर येऊन न घाबरता लढायला तयार होतील. एका मंत्र्यांचा तुम्ही राजीनामा घेतला हे तुमचे यश आहे.
पाऊस येतोय पण तुम्ही घाबरणार नाहीत, एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीला तुम्ही घाबरला नाहीत पावसाला काय घाबराल, असेही ते म्हणाले. या आंदोलनामुळे एकी दिसली. दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला, यापुढे शेतकऱ्यांवर अन्याय झाला तरी एकत्रित या, मजुरावर अन्याय झाला तरी एकत्रित या, मुलीवर महिलेवर अत्याचार झाला तरी एकत्रित या आता ही तुमची जबाबदारी आहे, असे रोहित पवार म्हणाले.
पुढच्या वेळी मतदान कुणाला करायचे ते ठरवून करा
तुमची एकजूट राज्यकर्त्यांना इशारा देत आहे की, नीट चाल नाहीतर आम्ही तुझ्याकडे बघून घेऊ. रस्त्यावरचा लढा आपण लढू शकतो. पुढच्या वेळी मतदान कुणाला करायचे ते ठरवून करा. संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात जो कोणी कार्य करेल, त्याच्या विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरावे लागणार आहे, आता आपल्यावर जबाबदारी वाढली आहे, असे देखील पवार म्हणाले.