

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलण्याची 30 सप्टेंबरअखेर असलेली मुदत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. या निर्णयाचे बँकिंग क्षेत्रातून स्वागत केले जात आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले, दोन हजार रुपयांच्या 96 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा झालेल्या आहेत. केवळ 4 टक्के नोटा बाजारात चलनात आहेत. रिझर्व्ह बँकेकडून या नोटा बदलण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती. त्यास मुदतवाढ मिळणे अपेक्षितच होते.
बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी 7 ऑक्टोबरपर्यंतच्या मुदतवाढीच्या आरबीआयच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मात्र, 8 ऑक्टोबरपासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करणे किंवा बदलण्याची प्रक्रिया बँकांमध्ये बंद होईल. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये नोटा बदलण्याची विनिमय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे आरबीआय रक्कम स्वीकारेपर्यंत या नोटाही कायदेशीर राहतील. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते म्हणाले, रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यास सात ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा