सोने 1,800 रुपयांनी स्वस्त | पुढारी

सोने 1,800 रुपयांनी स्वस्त

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दसर्‍याचे सोने लुटण्यास आणखी तीन आठवड्यांचा अवधी असताना, सराफ बाजारात मात्र सोन्याच्या दराने या वर्षातील नीचांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी आली आहे. 24 कॅरेट एक तोळा (10 ग्रॅम) सोन्याचा दर शनिवारी 57 हजार 100 (जीएसटी स्वतंत्र) रुपये होता. अनंत चतुर्दशीनंतर सोन्याचा दर 1,800 रुपयांनी उतरला आहे. आठवड्यातील सोने दरात 2,000 ते 2,200 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.

रविवारी बाजार उघडताना सोने 57 हजार रुपयांच्या आसपास असेल, असा व्यापार्‍यांचा अंदाज आहे. सोने दर 20 सप्टेंबर रोजी 59 हजार 220 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोमवारी (दि. 25) 59 हजार 30 रुपये दर होता. शुक्रवारी (दि. 29) तो 57 हजार 860 रुपये होता आणि शनिवारी (दि. 30) स्थानिक बाजार बंद असलेल्या काळात आणखी कमी होऊन 57 हजारपर्यंत खाली आला आणि आता पुन्हा थोडा वाढायला सुरुवात झाली, अशी माहिती सराफ बाजारातून मिळाली.

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड म्हणाले, सोन्याचा दर 57 हजारांच्या जवळपास खाली आला असून, या वर्षभरातील सर्वात कमी दर आहे. सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय मार्केटवर अवलंबून आहेत.

दसरा-दिवाळीचा सिझन तोंडावर असताना सोन्याच्या दरात झालेली घसरण, यामुळे खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणार्‍यांकडून अधिक विचारणा होत आहे, असे सराफ व्यापारी बन्सी चिपडे यांनी सांगितले.

चांदी दरातही घसरण

देशात सोन्याचा दर सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. मे महिन्यातदेखील सोने 57 हजार 200 रुपयांपर्यंत कमी होऊन पुन्हा दरात वाढ झाली होती, असे सराफ व्यापार्‍यांनी सांगितले. या कालावधीत चांदी प्रतिकिलो 73 हजार 500 रुपयांवरून 71,900 रुपयांवर आली आहे. गेल्या पाच दिवसांतच चांदी 1 हजार 600 रुपयांनी घसरली आहे.

Back to top button