गेलेले आमदार आमच्या संपर्कात : जयंत पाटील | पुढारी

गेलेले आमदार आमच्या संपर्कात : जयंत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगासमोर पुढील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्याबाबतीत सुनावणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गेलेले सर्वच आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला आहे. राजकीय पक्ष पळवण्याची किंवा चोरण्याची नवीन पद्धत सध्या सुरू झाल्याचा टोलाही त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. जयंत पाटील एका कार्यक्रमासाठी शनिवारी पुण्यात आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाच्या सुनावणीबाबत अनेक कयास केले जात आहेत. भारताच्या इतिहासात, पक्षाचे संस्थापक असताना त्यांनाच बाहेर काढण्याचा निर्णय काही लोक घेत आहेत. ते पक्ष आमच्याकडे असल्याच्या अविर्भावात आहेत. आमदार गेले की पक्ष जातो, अशी परिस्थिती झाली तर कोणतीही राजकीय व्यक्ती पक्ष काढण्याच्या भानगडीत पडणार नाही. निवडणूक आयोगासमोर 6 तारखेला होणार्‍या सुनावणीमध्ये अनेक प्रश्न समोर येतील. एका सुनावणीमध्ये हे संपणार नाही. मात्र, निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल, असा आम्हाला विश्वास आहे.

ओबीसी आरक्षणाविषयी पाटील म्हणाले, ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, अशी सर्वांची भूमिका आहे. ओबीसींचे जातनिहाय सर्वेक्षण व्हायला पाहिजे. मात्र हे सरकार ते करत नाही. नायब तहसीलदार हे पद महत्त्वाचे आहे. अनेक निर्णय या पदावरून होतात. हे पद जर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असेल तर ते चुकीचे आहे. मुळात हे सरकारच कॉन्ट्रॅक्टवर आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

शिवसेनेच्या 16 आमदारांबाबतीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकर निर्णय घेतला पाहिजे. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेक वर्षे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी ठाकरे यांच्याच दसरा मेळाव्याला परवानगी देणे गरजेचे आहे. सरकार ठाकरेंना परवानगी देईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

स्‍मरण : भूकमुक्तीचे ध्यासपर्व

सांगली : अवैध वाळू वाहतुक करणारा ट्रॅक्टर जप्त; तिघाजणांवर गुन्हा दाखल

दुचाकीतील पेट्रोल चोरुन नशा करणारी महिला दामिनी पथकाच्या ताब्यात

Back to top button