रानातला कवी, गीतकार हरपला; ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांची भावना

रानातला कवी, गीतकार हरपला; ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांची भावना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : साहित्याची गोडी बोली भाषेतून कळते. ते काम ना. धों. महानोर यांनी केले. बोलीभाषेतील वैविध्यपूर्ण शब्द त्यांनी दिले. ना. धों. महानोर हे कवी मुंबई-पुण्याच्या वनरूम बेडरूममध्ये बसून लिहीत नव्हते, तर शेताच्या बांधावर बसून लिहीत होते. त्यामुळे त्यांच्या कवितेत जिवंतपणा आहे. असा रानातला कवी, मनातला कवी आपल्यातून निघून गेला आहे. भाषेला, साहित्याला
वेगळेपण दिलेला कवी आणि गीतकार हरपला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी ज्येष्ठ कवी आणि गीतकार ना. धों. महानोर यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ना. धों. महानोर आणि ज्येष्ठ लेखक प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी फुटाणे बोलत होते. 'मसाप'चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, डॉ. सतीश देसाई, ज्येष्ठ लेखिका डॉ. नीलिमा गुंडी, कवी उद्धव कानडे, कवयित्री अंजली कुलकर्णी, आश्लेषा महाजन आदी उपस्थित होते.

फुटाणे म्हणाले, 'कविता लक्षात राहण्यासाठी गेयता लागते. ती गेयता महानोर यांच्या कवितेत होती. महानोर यांची पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही, तर प्रा. नरके यांनी महात्मा फुले यांचा विचार सर्वदूर पोचविण्यासाठी सातत्याने काम केले. खरे बोलणे महाराष्ट्रात पटकन स्वीकारले जात नाही. प्रा. नरके हे नेहमी खरे बोलले, ते घाबरले नाहीत. त्यांचे कार्य मोठे आहे.'

प्रा. जोशी म्हणाले, 'आपले रान न सोडता महानोर यांनी मराठी साहित्याचे शिवार हिरवेगार केले. निसर्गभान दिले. मराठीत निसर्ग कविता लिहिली जात होती. पण अनुभवातील अस्सलपणा महानोर यांनी कवितेत आणला. त्यांच्या कविता हिरव्या बोलीचा शब्द घेऊन आल्या. कवितेची हरवलेली लय महानोर यांनी पुन्हा मिळवून दिली.' डॉ. गुंडी म्हणाल्या, 'महानोर यांनी साहित्याला शब्दकळा दिल्या. त्यांच्या कवितेत सामाजिक भान आहे. महानोर यांची कविता महानगरातील लोकांना कधी अपरिचित वाटली नाही.'

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news