खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत दुर्गंधी

खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत दुर्गंधी

खडकी; पुढारी वृत्तसेवा : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमधील संजय गांधी भाजी मंडईत मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. यामुळे नागरिक व व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. पावसाचे पाणी साचल्याने, तसेच टाकाऊ भाज्या सडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाने मंडईत स्वच्छता राखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

या मंडईमध्ये अनेक भाजी विक्रेते हातगाड्या लावून आपला व्यवसाय करतात. जवळच फळ बाजार देखील आहे. मात्र, परिसरात पावसाचे पाणी साचल्याने सर्वत्र चिखल झाले असल्याचे चित्र दिसून येते. भाजी मंडईमध्ये खरेदी करण्यासाठी आलेले नागरिकांची यामुळे गैरसोय होत आहे. चिखल आणि फेकलेल्या भाज्यांमुळे परिसरात दुर्गंधीही पसरली असून, डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. यामुळे नागरिक व व्यावसायिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी 12 लाख रुपये खर्च करून मंडईत काँक्रिटीकरण केले होते. पावसाचे पाणी निचरा व्यवस्थित होणार असल्याचा दावाही प्रशासनाने हे काम करताना केला होता. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. मंडईत सर्वत्र पाणी, चिखल साचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मंडईमध्ये स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अतिक्रमणांमुळे नागरिक त्रस्त

बोर्ड प्रशासनाने आठ वर्षांपूर्वी मंडईतील सर्व व्यावसायिकांना ठराविक जागा निश्चित करून दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाची पाठ फिरताच व्यावसायिकांनी आपले बस्तान पूर्वीच्या ठिकाणी मांडले आहे. भाजी मंडईला जाणार्‍या रस्त्यावर अनेक अतिक्रमण झाल्याने नागरिक त्रस्त
झाले आहेत.

भाजी मंडईमधील विक्रेते खराब झालेल्या भाज्या कचराकुंडीमध्ये टाकतात. कचराकुंडी दररोज उचलण्यात येते. मंडईमधील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

-शिरीष पत्की, आरोग्य अधीक्षक, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news