लवंगी मिरची : निराश व्हायचे कारणच काय?

लवंगी मिरची : निराश व्हायचे कारणच काय?

काय हे अरविंद देवकर सर! एक शिक्षक म्हणून तुम्हाला नैराश्य आले होते म्हणून काय लगेच जीव देऊन टाकायचा? मान्य आहे की, तुमची नोकरी एका छोट्याशा गावामध्ये होती. एकशिक्षकी शाळेमध्ये अवघे दहा विद्यार्थी होते. त्यापैकी नऊ तुमची शाळा सोडून दुसर्‍या शाळेत निघून गेले म्हणून काय इतके निराश व्हायचे? विद्यार्थी असोत की नसोत, आपली जिल्हा परिषद शाळा आहे म्हटल्यानंतर एक तारखेला पगार घट्ट असतो. विद्यार्थी असोत की नसोत, आपला पगार सुरू आहे ना? मग, निराश व्हायचे कारणच काय?

हो, हो, त्या छोट्याशा शाळेमध्ये तुम्ही छान शिकवत होतात. गोष्टी सांगायचात, गाणी म्हणून घ्यायचात. विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेचा परिसर स्वच्छ करून घ्यायचात. विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाचा धडा शिकावा म्हणून तुम्ही त्यांना शौचालय साफ करण्याचे काम दिले. महात्मा गांधींनी सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणेच तुम्ही शाळा चालवत होतात. विद्यार्थ्यांकडून कामे करून घेताना तुम्हाला आणि तुम्ही सांगितलेली कामे करताना विद्यार्थ्यांना आनंद होत होता. पण, काय हे गुरुजी, बदललेला काळ तुमच्या लक्षात आलाच नाही. आपल्या मुलांना शाळेमध्ये शौचालय स्वच्छ करण्यास सांगितले, याचा राग मनात धरून पालकांनी त्यांना शाळेतून काढायला सुरुवात केली.

त्यात नेमके एक दिवस तुम्ही आजारी पडलात? शिक्षकाने असे आजारी पडणे तुम्हाला शोभले काय गुरुजी? अहो, जीव गेला तरी तुम्ही काम केलेच पाहिजे. कारण, तुम्ही एकटेच होतात. तुम्ही शाळेत एकटे होतात, शिक्षण विभागात एकटे होतात, त्या गावातही एकटे होतात आणि या पृथ्वीतलावरही एकटे होतात. एकटेपणा चालेल गुरुजी; पण तुम्हाला स्वतःमध्ये निगरगट्टपणा आणता आला नाही, हेच तुमच्या समस्येचे उत्तर आहे. आता हेच पहा ना, या नऊ विद्यार्थ्यांच्या सर्वच्या सर्व पालकांचा तुमच्यावर राग नसेल हे आधी समजून घ्या. या राज्यामध्ये दर चार लोकांमध्ये एक टग्या असतो. आपल्या पोराला शौचालय स्वच्छ करायच्या कामाला लावले, याचा प्रचंड राग त्या टग्याला असेल आणि त्याने इतर पालकांना तसे पटवून दिले असेल आणि मग त्या सर्वांनी तुमची शाळा सोडली.

जेमतेम दहा विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी सोडून गेल्यानंतर आपल्या शाळेत एकच विद्यार्थी राहिला. त्यामुळे नैराश्याने तुम्हाला घेरले. झाल्या प्रकारासाठी आपणच जबाबदार आहोत, असे लिहून तुम्ही त्याच शाळेच्या इमारतीमध्ये जीव दिलात. काय हे गुरुजी? अहो, ज्या राज्यामध्ये तब्बल चाळीसपेक्षा अधिक शिक्षणाधिकारी पदावर असणार्‍या व्यक्तींची लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये त्याचबरोबर कधी नव्हे ते ईडीकडूनसुद्धा चौकशी सुरू आहे. त्या राज्यातील तुमच्यासारख्या शिक्षकाने विद्यार्थी सोडून गेले हे मनावर घेऊन जीव देणे कसेच शोभत नाही. एक विद्यार्थी राहिला होता ना? त्याला शिकवायचे आणि दर एक तारखेला पगार घ्यायचा, त्याला गाणी शिकवायची, गोष्टी सांगायच्या पण मैदानही तुम्हीच साफ करायचे आणि हो, शौचालय पण तुम्हीच साफ करायचे!

झाल्या प्रकाराने तुम्ही फारच नाराज झालात. टोकाचे पाऊल उचलण्याआधी किमान आपल्या सहकारी शिक्षक मित्रांशी तरी बोलायचे. त्यांनी तुमचे मत परिवर्तन केले असते ना? पण, प्रवाहाबरोबर वाहत जाण्याचे तुम्ही नाकारलेत आणि एवढा लाख मोलाचा जीव गमावून बसलात. तुमचे कसे होणार गुरुजी? तुम्ही जीव दिलात म्हणून आमचाही जीव तळमळला म्हणून एवढ्या पोटतिडीकेने लिहीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news