नांदोशीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार! बोगस बिले काढल्याचा आरोप

नांदोशीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार! बोगस बिले काढल्याचा आरोप

खडकवासला(पुणे) : महापालिकेच्या अजब कारभाराने नागरिक अचंबित झाले आहेत. अवघ्या पाच हजार लोकवस्तीच्या नांदोशी गावात दोन वर्षांत बोगस कामे करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून दोषी अधिकारी व ठेकेदारावर
कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली

नांदोशी येथे गावातील रस्ता, चेंबर व स्मशानभूमी दुरुस्तीच्या कामात ठेकेदार व अधिकार्‍यांनी संगनमताने लाखोंचा भ्रष्टाचार केला आहे. प्रत्यक्षात नांदोशीत काम न करता इतर दूर अंतरावरील हिंगणे खुर्द आदी ठिकाणी केलेल्या कामांचे फोटो दाखवून 50 लाखांची बिले सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने काढल्याचा आरोप प्रशांत किवळे व नागरिकांनी केला आहे.

रस्ता, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांपासून नांदोशीचे नागरिक दोन वर्षांपासून वंचित आहेत. गावातील रस्त्याचे किरकोळ खड्डे बुजवून, मलमपट्टी केली आहे. गावातील रस्त्याच्या बिलाला दुसर्‍या गावातील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे फोटो जोडण्यात आले आहेत. दुरुस्तीअभावी स्मशानभूमी मोडकळीस आली आहे. मात्र, दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केल्याचे दाखविण्यात आले आहे. स्मशानभूमीचे पत्रे जीर्ण होऊन कोसळत आहेत. गवत झुडपे वाढली आहेत. अंत्यविधी करताना स्मशानभूमी कोसळून दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बोगस बिले काढल्याची तक्रार

नांदोशी येथील चेंबरच्या दुरुस्तीच्या कामात सर्वात गंभीर प्रकार पुढे आला आहे. कामाच्या बिलाला जिओ टॅगिंग असलेले थेट हिंगणे खुर्द, किरकटवाडी, खडकवासला येथील फोटो जोडण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामपंचायतीने केलेली कामे दाखवूनही बोगस बिले काढण्यात आल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

नांदोशी येथील नागरिकांनी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या कामांबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे मुख्य खाते, तसेच दक्षता विभागाकडून संबंधित कामांची चौकशी केली जाईल. त्रुटी आढळल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल.

-संदीप खलाटे, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news