

पुणे : भटक्या श्वानांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दलची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतली आणि याचिकेतील दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजीच्या अंतरिम निर्णयान्वये राज्यात ‘प्राणी जन्म नियंत्रण नियमा’ची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्राणी कल्याणासाठी केंद्र सरकारने आखून दिलेल्या ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’च्या मार्गदर्शक सूचनांचा सूक्ष्म अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे मत पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाकडील सर्व पशुधन विकास अधिकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखालील पशुवैद्यकांना एक दिवसीय उजळणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्याबाबत शासनस्तरावरून निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ आणि राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र (गोखलेनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच पशुसंवर्धन आयुक्तालयात राज्यस्तरीय कार्यक्रम झाला. त्यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांतील निष्णात पशु शल्यचिकित्सकांनी सहभाग नोंदवला.
या वेळी पशुसंवर्धनचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, पशुधन व नियोजनचे सह आयुक्त डॉ. देवेंद्र जाधव, रोग अन्वेषण विभागाचे सह आयुक्त डॉ. अंकुश परिहार, महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, गोखलेनगर येथील राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. प्रशांत भड यांच्यासह राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रदीप खंडाळे, व्याख्याते डॉ. इरफान सय्यद, इंडिया वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेसचे संचालक (विशेष मोहीम) डॉ. शशिकांत जाधव, निर्मिती पीपल्स ॲंड ॲनिमल वेल्फेअर सोसायटीचे डॉ. राहुल बोंबटकर, सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटलचे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. बाळासाहेब गायकवाड आणि डॉ. अभिजित क्षीरसागर आदी यांनीही या विषयावर विचार मांडले.
या कार्यक्रमातील तांत्रिक मार्गदर्शनात श्वानांच्या शस्त्रक्रिया करताना पाळावयाचे नियम, स्वच्छता आणि शस्त्रक्रियेनंतरची काळजी यावर सविस्तर चर्चा झाली. दुपारच्या सत्रात औंध येथील सुपरस्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष श्वानांवर शस्त्रक्रिया करून सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नसबंदी कशी करावी, याचेही प्रशिक्षण या वेळी देण्यात आल्याचे आयुक्तालयातून सांगण्यात आले.
पशुसंवर्धन आयुक्तालयात आयोजित प्रशिक्षणास उपस्थित असलेले पशुवैद्यकीय अधिकारी.