

पुणे : एका सैनिकाच्या बाळाला जन्मताच गुंतागुंतीच्या हृदयरोगाचे निदान झाले. ते बाळ कोलकाता येथील लष्करी रुग्णालयात जन्मले. त्याला तातडीने पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस) मध्ये दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करत देशातील पहिली एक्स्ट्रा-कॉर्पोरियल मेम्बेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करून जन्मजात हृदयरोग असलेल्या नवजात बाळाचा जीव वाचवला. शस्त्रक्रिया होताच बाळाचे नाव अर्पित ठेवण्यात आले.
कोलकाता येथील कमांड रुग्णालयात एका सैनिकाच्या पत्नीला गर्भपातांचा वारंवार सामना करावा लागला. त्यामुळे नव्या गर्भधारणेत बाळाला धोका संभवण्याची शक्यता होती. मात्र, डॉक्टरांनी तो धोका एक वैद्यकीय आव्हान समजून स्वीकारले. सैनिकाच्या पत्नीला गर्भधारणा झाली अन् प्रसूती होऊन अर्पित जन्माला आला. मात्र, जन्मानंतर काही तासांतच तो खूप आजारी झाला. त्याला जन्मतः हृदयरोगाचे निदान झाल्याने सर्व जण चिंतेत होते.
गंभीर अन् गुंतागुंतीच्या हृदयरोगामुळे बाळाचे हृदय शरीराला पुरेसा रक्तपुरवठा करू शकत नव्हते.
प्रगत वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय त्याचे जगणे अशक्य होते. त्याला कोलकाता येथून पुण्यातील कमांड रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले.
बाळाची प्रकृती स्थिर असली तरी, त्याला निश्चित उपचारांची आवश्यकता होती. ज्यामध्ये ओपन-हार्ट सर्जरीचा समावेश होता.
पुण्यातील एआयसीटीएस ही आपल्या सशस्त्र दलांची एक अग््रागण्य संस्था आहे. कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रिया, कार्डिओलॉजी आणि श्वसन औषधशास्त्र या क्षेत्रांमध्ये ही संस्था अग््रागण्य मानली जाते..
फुफ्फुसाच्या संसर्गाने आणि मूत्रपिंड कमकुवत असल्यामुळे बाळाची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.
पुणे एआयसीटीएसमधील डॉक्टरांच्या टीमने, उच्च-वारंवारता व्हेंटिलेटरी सपोर्ट आणि पेरिटोनियल डायलिसिससह प्रगत नवजात अतिदक्षता विभागाचा वापर करून त्याला स्थिर केले.
अखेरीस त्याच्या फुफ्फुस आणि मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये सुरुवातीची स्थिरता आल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्याच्या गंभीर हृदय आणि फुफ्फुसाच्या खराब स्थितीमुळे शस्त्रक्रियेनंतरच्या काळात त्याला व्हेंटिलेटरवरून काढता आले नाही.
व्हेंटिलेटरी सपोर्टवर असतानाच शस्त्रक्रियेसाठी घ्यावे लागले. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही त्याची फुफ्फुसे आणि हृदय लगेच रक्त पंप करण्याचा भार पेलू शकली नाहीत.
त्याला या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि त्याच्या हृदयाला व फुफ्फुसांना बरे होण्यासाठी एका ‘पुलाची’ आवश्यकता होती.
या पुलालाच वैद्यकीय भाषेत ‘हृदय-फुफ्फुस सपोर्ट मशीन’ किंवा एक्स्ट्रा-कॉर्पेारियल मेम्बेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) मशीन म्हणतात.
ईसीएमओ ही एक अत्यंत महत्त्वाची जीवनरक्षक प्रक्रिया आहे. शरीरातील ऑक्सिजनीकरण आणि रक्ताभिसरण टिकवून ठेवण्यासाठी आपल्याकडील हे शेवटचे शस्त्र आहे.
रुग्णाचे संपूर्ण रक्त या मशीनमधून प्रवाहित केले जाते आणि ते रक्ताला ऑक्सिजन देऊन शरीरात पंप करते. हे एक कृत्रिम हृदय आणि फुफ्फुसासारखे काम करते.
प्रौढांमध्येही ईसीएमओचा वापर करणे एक आव्हान असते.
तीन किलोंपेक्षा कमी वजनाच्या नवजात बालकामध्ये ईसीएमओ लागू करण्यासाठी अचूकता, चोवीस तास सतर्कता आणि विविध विभागांमध्ये अखंड सांघिक कार्याची गरज असते.
एआयसीटीएसमधील बालरोगतज्ज्ञ, नर्सिंग कर्मचारी, कार्डियाक-थोरॅसिक भूलतज्ज्ञ आणि बालरोग, हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने ही किमया साधली.
90 तास ईसीएमओच्या आधारावर राहिल्यानंतर, अर्पित त्यातून अधिक मजबूत होऊन बाहेर आला.
त्याचे हृदय आणि फुफ्फुसे पूर्ववत झाली, ज्यामुळे त्याला जीवनरक्षक प्रणालीपासून यशस्वीपणे वेगळे करणे आणि स्वतंत्रपणे श्वास घेणे शक्य झाले. त्याने जन्मतःच एक लढवय्या असल्याचे सिद्ध केले.
ही कामगिरी एआयसीटीएसमधील पहिले यशस्वी नवजात ईसीएमओ ठरली आहे.