

खेड : भीमाशंकर (ता. खेड) येथे पुण्यातील चंदननगर येथील रहिवासी असलेल्या एका शिक्षिकेसह त्यांच्या पती आणि मुलाला देवस्थान आवारातील सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये एक निळा शर्ट आणि काळे जॅकेट घातलेली व्यक्ती तसेच सात सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे.
फिर्यादी माया हंबीर लंघे (वय ४८, व्यवसाय शिक्षिका, रा. संघर्ष चौक, चंदननगर, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. २४) दुपारी सुमारे १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास भीमाशंकर देवस्थानातील राम मंदिराजवळ त्यांना सुरक्षा रक्षकांकडून होत असलेल्या धक्काबुक्कीबाबत विचारणा केली होती. यावरून संतापलेल्या आरोपींनी फिर्यादी, त्यांचे पती हंबीर लंघे आणि मुलगा राजवर्धन यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली, याशिवाय शिवीगाळ करून फिर्यादींचा मोबाईल जमिनीवर आपटून तोडण्यात आला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये निळा शर्ट व काळे जॅकेट घातलेली कानात बाळी घातलेली एक व्यक्ती, चार पुरुष सुरक्षा रक्षक आणि तीन महिला सुरक्षा रक्षक यांचा समावेश असून, त्यांची पूर्ण नावे व माहिती अद्याप उपलब्ध नाही. घटनेच्या वेळी देवस्थानात भाविकांची गर्दी होती.पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग असलेले प्रमुख तीर्थक्षेत्र असून, अशा घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. देवस्थान ट्रस्टकडून याबाबत अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. पोलिस तपास सुरू असून, लवकरच आरोपींना अटक होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.