

भिगवण : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल पुणे व चांदमल मुनोत पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 3 ते 5 जानेवारीदरम्यान 32 वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटल येथे करण्यात आल्याची माहिती पुणे विभाग अध्यक्ष सचिन बोगावत यांनी दिली.
या मोफत शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेतून येऊन डॉ. लॅरी वाइनस्टीन दरवर्षी रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करतात. सन 1993 पासून संचेती हॉस्पिटलमध्ये पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्यामार्फत मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. त्यांच्या निधनानंतर मागील 14 वर्षांपासून हे शिबिर त्यांचे शिष्य, सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. लॅरी वाइनस्टीन यांच्यामार्फत पुढे सुरू ठेवण्यात आल्याचे बोगावत यांनी सांगितले.
या शिबिरामध्ये फाटलेले ओठ, नाक-भुवया-कान विकृती, चेहऱ्यावरील विद्रूप वण व डाग, पापण्यांच्या विकृती, फुगलेले गाल, चिकटलेली बोटे यांचा समावेश असणार आहे. सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार असल्याने याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शिबिर जरी तीन दिवसांचे असले तरी रुग्णांची नोंदणी व तपासणी फक्त शनिवारी (दि. 3 जानेवारी) सकाळी 9 ते 12 या वेळेतच करण्यात येणार आहे. उर्वरित कालावधीत निवड झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया पार पडतील असेही सचिन बोगावत यांनी सांगितले. पुण्याव्यरिक्त डॉ. लॅरी वाइनस्टीन व त्यांच्या टीममार्फत जानेवारीमध्ये जळगाव, नाशिक, संगमनेर व दिल्ली येथेही अशाच प्रकारची मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत.