पुणे; पुढारी वृत्तसेवा :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवारी (दि. 22 मे) होणार्या सभेला पोलिसांनी अटी, शर्तींवर परवानगी दिली आहे. धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये सभेत करू नयेत आदी विविध अटी पोलिसांनी घातल्या आहेत. स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी सकाळी दहा वाजता राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून वातावरणनिर्मिती केली आहे.
या सभेला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून रविवारी सकाळपासून स्वारगेट परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ठाकरे यांनी धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये करू नयेत, घोषणाबाजी करू नये, तसेच सभेला येणार्यांनी सभेला येताना किंवा सभा संपल्यानंतर वाहन फेर्या काढू नयेत, यासह विविध अटींवर परवानगी देण्यात आल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर रविवारी ते पहिल्यांदाच कार्यकर्त्यांसमोर बोलणार आहेत. पुण्यातील गणेश कला व क्रीडा मंच येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा होत असून, ते शिवसेनेच्या सभेला काय उत्तर देणार, तसेच अयोध्या दौर्यासंदर्भात काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे पहिल्यांदाच सकाळी 10 वाजता जाहीर सभा घेत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.