कोल्हापूर : सागर यादव : राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्तच्या शाहू कृतज्ञता पर्वात ब्रँड कोल्हापुरी चप्पलची 'चप्पल लाईन' हा उपक्रम हाती घेण्यात आला. 100 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या कोल्हापुरी चप्पलची कीर्ती जगात पोहोचली खरी; परंतु व्यावसायिक वृद्धीसाठी अनेकदा करण्यात आलेली कोल्हापुरी चप्पलच्या क्लस्टर निर्मितीची उदासीनता कायम असल्याचे चित्र यावेळीही दिसले. 'चप्पल लाईन' उपक्रमात सर्वांनीच भाषणे केली खरी; परंतु क्लस्टर निर्मितीसाठी उदासीनताच दिसली भारी, याचा प्रत्यय आला.
रांगडेपणा व मर्दानी बाज जपणार्या कोल्हापुरी चप्पलची ख्याती महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक बाजारपेठांतही आहे.
चप्पल यात्रेमुळे प्रोत्साहन
यंदा कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे 'राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व' अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. चप्पल लाईनला घेतलेल्या 'चप्पल यात्रे'मुळे चप्पल व्यवसायाला प्रोत्साहन मिळाले.
कोल्हापुरी चप्पलचे वैविध्य
चप्पल बाजारात पुरुष व स्त्रियांसाठी विविध प्रकारच्या चपला उपलब्ध आहेत. यात कापशी, कुरुंदवाडी, जरी, खास कोल्हापुरी, मेहरबान, जेन्टस्, सहा वेणी, व्हर्चून, पिंजरा, पुडा पंचिंग सुरक्षा, शाहू, गांधी, बुनियाद, सुरक्षा, पाचवेणी, चपली पट्टा, वीणा, एक वेणी, मयुरी, बारा वेणी, लेडीज चपली, बिस्कीट पान, स्लिपर पट्टी, मंदाकिनी, जरी गोंडा अशा व्हरायटी आहेत.
जिल्ह्यात साडेतीन हजार कारागीर
जिल्ह्यात सुमारे 3 हजार 500 हून अधिक चप्पल कारागीर आहेत. सांगलीसह कर्नाटक परिसरातील गावातही मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी चप्पल निर्मिती होते. येथील चप्पल लाईनमध्ये 75 हून अधिक दुकाने आहेत. शिवाय अंबाबाई मंदिर, ताराबाई रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड अशा विविध ठिकाणी लहान-मोठी दुकाने आहेत. कोल्हापूर चप्पलनिर्मिती व्यवसायात दरवर्षी सुमारे 20 ते 25 कोटींची उलाढाल होते.
चप्पल उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न
या उद्योगाच्या व्यवसायासाठी शिवाजी विद्यापीठ आणि चेन्नईच्या सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सामंजस्य करार झाला आहे. कारागिरांचा दर्जा सुधारणे आणि कौशल्य निर्मितीविषयक शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यास मदत करणे ही या कराराची उद्दिष्टे आहेत.
देश-विदेशातील बाजारात मोठी मागणी
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये कोल्हापुरी चप्पलला मोठी मागणी आहे. न्यूयॉर्क, लंडन, सिडनी, जपान, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम व रशिया अशा विविध देशांतील मॉल्समध्ये कोल्हापुरी चपला सजल्या आहेत.
चप्पलचे दर
म्हैस, बैलांच्या कातड्यापासून हाताने बनवलेली आणि चामड्याच्या वादीने शिवलेली चप्पल ही अस्सल कोल्हापुरी चप्पल म्हणून ओळखली जाते. टिकाऊ चप्पलचा दर 1500 ते 2500 रुपये इतका आहे. मध्यम दर्जाच्याच चप्पलचा दर 800 ते 1500 रुपये इतका आहे. हलक्या चप्पलचा दर 300 ते 700 रुपयांपर्यंत आहे.
कोल्हापूरची खासीयत असणार्या कोल्हापुरी चप्पल निर्मितीतही वाढ झाली आहे. देश-विदेशातून येणार्या पर्यटकांकडून आवर्जून कोल्हापुरी चप्पलची खरेदी होत आहे. 'शाहू कृतज्ञता पर्व'अंतर्गत आयोजित चप्पल यात्रेचेही प्रोत्साहन व्यावसायिकांना मिळाले.
– दीपक खांडेकर, व्यावसायिक