सातारा : नवीन शाळा प्रवेशाचा बिगुल वाजला | पुढारी

सातारा : नवीन शाळा प्रवेशाचा बिगुल वाजला

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सध्या राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया विविध टप्प्यांवर पार पडत असतानाच जिल्ह्यातील विविध शाळांमध्येही नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशांचा बिगुल वाजला आहे. सातारा शहरातील विविध शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन स्तरावर प्रवेश अर्ज देणे-स्वीकारणे, कागदपत्रांची छाननी करणे, दाखल्यांचे वितरण करणे आदी कामांची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांची उन्हाळी सुट्टी सुरु असताना कार्यालयीन कर्मचार्‍यांच्या कामाची व्याप्ती वाढली आहे.

सध्या सर्वच शाळांना उन्हाळी सुट्ट्या पडल्या असून विद्यार्थी व शिक्षक या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. दि. 12 जूनपर्यंत या सुट्ट्या असून 13 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षातील वर्ग सुरु होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त अनुदानित, विना अनुदानित व खाजगी शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशांचा बिगुल वाजला आहे.

आरटीई सोडतीचे प्रवेश एप्रिल अखेरीपासून सुरु झाले आहेत. मात्र हे प्रवेश केवळ 25 टक्के आरक्षित प्रवेश क्षमतेसाठीच असल्याने इतर विद्यार्थी व पालक निश्चिंत होते. मात्र दि. 17 मेपासून सातारा शहरातील विविध मान्यताप्राप्त तसेच खाजगी शाळांमध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक 5 वी, 8 वी च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया शाळा आपापल्या स्तरावर राबवत असून प्रवेश अर्ज देणे व स्वीकारण्याच्या कामासाठी शाळांच्या कार्यालयांमध्ये पालक व विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाची व्याप्ती वाढली आहे.

प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असली तरी प्रत्यक्ष प्रवेश जूनमध्येच देण्याचे नियोजन शाळांनी केले आहे. काही खाजगी शाळांनी मागील शैक्षणिक वर्षातील निकाल लागताच प्रवेश अर्ज वितरीत करुन अ‍ॅडव्हान्स बुकींगही केले आहे. अशी नोंदणी केलेल्या पालकांचा शाळांकडूनच फॉलोअप घेतला जात असून गरजेनुसार आवश्यक सुचनाही दिल्या जात आहे. काही शाळांनी आपापल्या स्तरावर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तयार केले असून ते राबवण्याची जबाबदारी कार्यालयीन कर्मचार्‍यांवर सोपवण्यात आली आहे. विद्यार्थी व शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या असल्या तरी कार्यालयीन कर्मचार्‍यांची मात्र धांदल उडत आहे.

महाविद्यालयांमध्ये मात्र परीक्षांची लगबग…

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे वार्षिक शैक्षणिक कामकाज अटोपल्याने त्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. परंतू कोरोनामुळे महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष पुढे गेले आहे. जूनअखेर महाविद्यालयांना या शैक्षणिक वर्षातील परीक्षा, निकालासह सर्व कामकाज पूर्ण करावयाचे असल्याने सध्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये दुसर्‍या सत्र परीक्षांची लगबग सुरु झाली आहे. वेळेत परीक्षा व वेळतच निकाल लावण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाची तारेवरची कसरत सुरु आहे.

Back to top button