डॉ. योगेश जाधव
भारतीय दूरसंचार उद्योगाने डिजिटल स्पेसमध्ये क्रांती घडवून आणण्यात आणि सेवा-आधारित आर्थिक वाढीमध्ये अतुलनीय भूमिका बजावली आहे. फाईव्ह-जी नेटवर्कमुळे इंटरनेटचा वेग तर वाढेलच; शिवाय विकास आणि रोजगारनिर्मितीचाही वेग वाढेल. अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासासह कनेक्टिव्हिटीमधील सुधारणा एकविसाव्या शतकातील विविध क्षेत्रांच्या विकासाची दिशा ठरवेल. तसेच कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि वाहतूक या क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व बदल होतील.
एकविसाव्या शतकाला 'माहितीचे युग' असे म्हटले जाते. विसाव्या शतकात इंधनाला जे मूल्य होते, ते आज डेटा म्हणजेच विदाला आले आहे. 'डेटा इज न्यू ऑईल' असे म्हटले जाते. ज्याच्या हाती माहितीचे भांडार तो खरा श्रीमंत! अशी रचना आज आकाराला आली आहे. इंटरनेटच्या प्रस्फोटानंतर माहितीच्या महासागराची दारे खुली झाली आणि जगभरात ही क्रांती घडून आली आहे. विशेषतः मोबाईलवर वेगवान इंटरनेटसेवा उपलब्ध झाली आणि स्मार्टफोनचा आविष्कार उदयाला आला, तेव्हापासून माहितीचे आदानप्रदान कमालीचे वाढले. खास करून फोर-जी तंत्रज्ञान आल्यानंतर ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली. गावाखेड्यांपर्यंत फोर-जी तंत्रज्ञान पोहोचल्यामुळे बहुतांश जणांचा इंटरनेटचा वापर वाढत गेला.
इंटरनेट सेवा पुरवणार्या कंपन्यांनी तुलनेने कमी पैशांत फोर-जी सेवा देऊ केल्यामुळे युट्यूब, फेसबुक, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम, नेटफ्लिक्स, टेलिग्राम यांसह विविध अॅप्सचा वापर करणार्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत गेली. आज इंटरनेट वापराच्या प्रमाणात भारत चीन, अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया, स्पेन आणि जर्मनीच्या खूप पुढे आहे. भारतीय युजर्स 1 जीबी डेटामध्ये एकावेळेला 200 गाणी ऐकण्याबरोबरच एक तासांपर्यंत एचडी क्वॉलिटीमध्ये व्हिडीओ पाहू शकतात. भारतात डेटाची जगाच्या तुलनेत किंमत खूप कमी आहे. भारतात 1 जीबी डेटाची किंमत 7 रुपये आहे. स्वस्त प्रीपेड प्लॅन आणि स्मार्टफोन्समुळे आज भारतात सर्वात जास्त इंटरनेटचा वापर केला जात आहे. भारतातील लोक एका महिन्यात व्हिडीओ पाहण्यासाठी तसेच अॅप्सवर तब्बल 11 जीबी डेटा खर्च करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोव्हिड महासंसर्गाच्या काळात तर मोबाईल आणि इंटरनेटने अनेकांना अक्षरशः आधार देण्याचे काम केले. लॉकडाऊनच्या काळात केवळ मनोरंजनासाठीच नव्हे, तर विविध वस्तूंची मागणी करण्यासाठी, बिले भरण्यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेटची खूप मोठी मदत झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच फोर-जी तंत्रज्ञानामुळे देशाच्या शिक्षणविश्वात ऑनलाईन एज्युकेशनचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो, हे समोर आले. भलेही त्यामध्ये अनेक अडचणी-अडथळे निर्माण झाले; परंतु फोर-जी इंटरनेट नसते तर कोरोना काळात शिक्षणव्यवस्था ठप्प झाली असती, हे वास्तव नाकारता येणार नाही. टू-जी, थ्री-जी, फोर-जी यातील 'जी' या शब्दाचा अर्थ 'जनरेशन' असा आहे. जनरेशन म्हणजे आवृत्ती. एखाद्या पुस्तकाच्या जशा आवृत्त्या निघत जातात तसेच मोबाईल इंटरनेट तंत्रज्ञानातील या सुधारित आवृत्त्या आहेत. सुधारित असे म्हणण्याचे कारण प्रत्येक नव्या आवृत्तीमध्ये लक्षणीय बदल आणि अधिकाधिक नवी वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. फोर-जीच्या अभूतपूर्व यशानंतर भारतात आता फाईव्ह-जीचे आगमन उंबरठ्याशी आले आहे.
भारतीय दूरसंचार उद्योगाने डिजिटल स्पेसमध्ये क्रांती घडवून आणण्यात आणि सेवा-आधारित आर्थिक वाढीमध्ये अतुलनीय भूमिका बजावली आहे. गेल्या दशकात या क्षेत्राचा जागतिक स्तरावरील अव्वल क्षेत्रांमध्ये समावेश झाला आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीचा पायादेखील फाईव्ह-जी आणि सिक्स-जी यांसारख्या मोबाईल नेटवर्कच्या कार्यक्षमतेवर घातला जाणार आहे. तसेच विकसनशील समाजाला नवोपक्रम आणि आधुनिक समाजाला अद्ययावत बनविण्यात या सेवांची प्रभावी भूमिका आहे.
सध्या देशभरात थ्री-जी आणि फोर-जी टेलिकॉम नेटवर्क पसरले आहे आणि कंपन्या येत्या काही महिन्यांत फाईव्ह-जी नेटवर्क सुरू करण्याच्या तयारीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा आहे की, दशकाच्या अखेरीस भारत सिक्स-जी नेटवर्कचे उद्दिष्टदेखील साध्य करेल. त्यामुळे अल्ट्रा हायस्पीड इंटरनेट, उच्च कनेक्टिव्हिटी ही उद्दिष्ट्ये साध्य होतील. दूरसंचार क्षेत्रातील नियामक संस्था असलेल्या टीआरएआयच्या (ट्राय) रौप्यमहोत्सवी समारंभात पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला, की फाईव्ह-जी नेटवर्क सुरू केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला 450 अब्जांचा फायदा होईल.
फाईव्ह-जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा वेग तर वाढेलच; शिवाय विकास आणि रोजगारनिर्मितीचाही वेग वाढेल. फोर-जी नेटवर्कने हेवी फाईल्स काही मिनिटांत ट्रान्सफर करणे, व्हिडीओ शेअर करणे, दाखवणे सोपे बनविले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि लाईव्ह व्हिडीओ शेअर करण्याची मोकळीक दिली होती. फाईव्ह-जी नेटवर्क आपल्याला याहीपुढे घेऊन जाईल. व्हिडीओ शेअरिंग आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसारख्या सुविधा फोर-जी येण्यापूर्वीही होत्याच; परंतु फोर-जीच्या आगमनानंतर त्या गतिमान झाल्या. आता फाईव्ह-जी नेटवर्क या क्रिया आणखी गतिमान करेल. ज्याप्रमाणे प्रत्येक घरातील नवी पिढी अधिक उन्नत आणि नवीन विचारांची असते, त्याप्रमाणेच फाईव्ह-जीचा अवतार विविध सुखद धक्के देणारा ठरणार आहे. हे नेटवर्क 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' या येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा पाया ठरेल.
म्हणजेच, जास्तीत जास्त वस्तू गतिमान इंटरनेटशी कनेक्टेड होऊ लागतील. काही कंपन्यांच्या मते, टू-जीमध्ये आवाजावर आणि एसएमएसवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. थ्री-जीमध्ये वेब ब्राऊजिंग महत्त्वाचे मानले गेले. फोर-जीमध्ये जलदगतीने डेटा ट्रान्सफर आणि व्हिडीओ स्ट्रीमिंगकडे अधिक लक्ष देण्यात आले. आता फाईव्ह-जी नेटवर्क उपभोक्त्याला अधिक सुरक्षितता प्रदान करणार आहे. फोर-जीकडून फाईव्ह-जीकडे होणारी वाटचाल केवळ सामान्य उपभोक्त्यालाच नव्हे, तर उद्योगविश्वालाही साह्यभूत ठरेल. अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासासह कनेक्टिव्हिटीमधील सुधारणा एकविसाव्या शतकातील विविध क्षेत्रांच्या विकासाची दिशा ठरवेल. तसेच कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि वाहतूक या क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व बदल होतील. फाईव्ह-जी सुविधा मोठे सामाजिक बदल घडवून आणेल, असा कंपन्यांचा दावा आहे. व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेन्टेड रिअॅलिटी आणि फोर-के व्हिडीओजचे दरवाजे या नेटवर्कमुळे खुले होतील. 2023 पर्यंत संपूर्ण डाटा ट्रॅफिकमध्ये फाईव्ह-जीचा हिस्सा 20 टक्के असेल.
गेल्या दशकात इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. त्यामुळे भारत हे जगातील मोबाईल उत्पादन केंद्र बनले आहे. आता स्वदेशी फाईव्ह-जी टेस्टबेड हे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे. फाईव्ह-जी नेटवर्कने समृद्ध अशा तंत्रज्ञानाचा डेटा ट्रान्सफरचा वेग अधिक असेल. म्हणजेच हे तंत्रज्ञान कनेक्टेड आणि ऑटोमेटेड सिस्टिमला नवीन आयाम देण्यासाठी विशेषतः प्रभावी आहे. त्याच वेळी हे धोरण निर्मात्यांसाठी एक उत्प्रेरक साधन बनेल, जे नागरिक आणि व्यावसायिकांना संवेदनशील आणि मजबूत करण्यास मदत करेल. मजबूत डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदींनी सुमारे सात वर्षांपूर्वी डिजिटल इंडियाची सुरुवात केली होती. त्यावेळी केवळ 19 टक्के लोकसंख्या इंटरनेटशी जोडली गेली होती. परंतु गेल्या सात वर्षांत झालेला बदल आज प्रत्येक वर्गाला जाणवत आहे.
मात्र, डेटा सुरक्षा, आधारची वैधता यांसारखे प्रश्नही पुढे आले आहेत. तथापि, 'डिजिटल इंडिया' कार्यक्रमांतर्गत कल्पना केलेल्या कनेक्टिव्हिटीसह कौशल्य आणि डिजिटल गव्हर्नन्सच्या एकत्रित प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले आहे. आधारच्या माध्यमातून सुधारित सरकारी सेवा, अनुदान, कल्याणकारी योजना, बँक खाती आदी लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले आहेत. डिजिटायझेशनच्या परिवर्तनीय प्रभावावर खर्या अर्थाने विश्वास ठेवणार्या तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि उद्योजकांसाठी हे वरदानच आहे. भारत महामारीच्या प्रभावातून सावरत आहे. डिजिटल मोहीम हे त्या प्रक्रियेतील मोठे माध्यम आहे आणि यापुढेही राहील.
फाईव्ह-जीच्या आगमनामुळे होणारे फायदे अनेक असले, तरी दुसर्या बाजूला यानिमित्ताने काही प्रश्नांचाही विचार करायला हवा. मुख्य म्हणजे या तंत्रज्ञानाबाबत जगभरात अनेकांनी साशंकता व्यक्त केली आहे. फाईव्ह-जी टॉवरच्या फ्रिक्वेन्सीमुळे अल्टिमीटरचे रीडिंग बदलण्याचीही शक्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच अमेरिकेतील विमान वाहतूक उद्योगाने फाईव्ह-जीला विरोध केला असून, उड्डाणे रद्द करण्यापर्यंत ही समस्या पोहोचली आहे. उड्डाणांवर परिणाम होऊ नये यासाठी दूरसंचार कंपन्यांनी कमी बँडवर काम करावे, असे विमान वाहतूक उद्योगाचे म्हणणे आहे. आपल्याकडे या नेटवर्कच्या तांत्रिक किंवा आरोग्यविषयक परिणामांबद्दल व्यवस्थित माहिती नाही. याचा एक परिणाम असा झाला आहे, की लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारची भीती बसली आहे. दूरसंचार कंपन्यांकडे भरपूर पैसा असूनसुद्धा त्या याबाबत संशोधन का करत नाहीत? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
याखेरीज सर्वात महत्त्वाचे दोन प्रश्न म्हणजे डेटा सुरक्षिततेचा आणि मोबाईलच्या अतिवापराचा. फाईव्ह-जी तंत्रज्ञान अवतरल्यानंतर डिजिटायजेशन प्रचंड गतिमान होईल, ही बाब खरी असली तरी त्यातून आधीच असुरक्षित बनलेला खासगीपणा आणखी धोक्यात येणार नाही ना, यावर विचारमंथन आणि कृतियोजना आखल्या गेल्या पाहिजेत. कारण इंटरनेटचा वेग वाढला की 'स्मार्ट' असे विशेषण घेऊन येणारी नवनवीन उपकरणे आणि सेवा बाजारात थैमान घालतील आणि आधुनिक उपकरणांना संपत्ती व प्रतिष्ठा मानणारी पिढी त्यावर तुटून पडेल. पण त्यातून सुरक्षिततेचे गंभीर प्रश्न उद्भवू शकतात, याची जाण ठेवलेली बरी. तसेच मोबाईल तंत्रज्ञानाचे गोडवे कितीही सुश्राव्य असले, तरी आभासी दुनियेत गुरफटत चाललेल्या समाजामुळे निर्माण झालेले प्रश्नही दुर्लक्षून चालणार नाहीत. प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार करायलाच हवा; पण तंत्रज्ञानाच्या या नवनवीन लाटांवर स्वार होताना दुसर्या बाजूला त्याच्या वापराबाबतचे, धोक्यांबाबतचे प्रबोधनही केले जायला हवे. यासाठी कार्यशाळा, प्रशिक्षणांचे आयोजन केले गेले पाहिजे.