

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरात गुरुवारी (दि. 8) सायंकाळी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दैना उडाली. शहरातील तीन हत्ती चौकात भेळ सेंटरच्या गाळ्यात पाणी भरले गेले. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांनी तत्काळ धाव घेत पाणी काढून दिले. शहरातील अन्य भागांतही रात्री उशिरापर्यंत मदतकार्य केल्याने परिस्थिती पूर्वपदावर आणली.
मोठा पाऊस झाल्यानंतर बारामती शहरात अनेक अडचणी निर्माण होतात. गुरुवारी हीच स्थिती शहरात पाहायला मिळाली.
रस्ते व पूल उंचावर गेल्याने शहरातील तीन हत्ती चौकातील भारत भेळ या दुकानात पाणी भरले गेले. मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे, कुणाल लालबिगे, मुकादम रणजित अहिवळे, संदीप जेधे, गोपाळ वाल्मिकी, नीलेश अहिवळे यांनी तेथे धाव घेत सक्शन मशिनद्वारे पाणी उपसा करून गाळा पूर्ववत करून दिला. याशिवाय शहरातील महादेव मळा भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. तेथेही सक्शन मशिनद्वारे पाणी उपसा करण्यात आला.
हेही वाचा