कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरात बुधवारी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आता आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलने विशेष पथक नियुक्त केले आहे. त्याद्वारे आक्षेपार्ह पोस्ट दिसताच संबंधितावर तत्काळ कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. दरम्यान, दंगलग्रस्त भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याद्वारे संशयितांचा शोध घेतला जाणार आहे.
औरंगजेबाचा फोटो स्टेटसला ठेवून त्याचे उदात्तीकरण करण्याच्या प्रकाराविरुद्ध हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. याविरोधात बुधवारी दंगल उसळली. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सायबर पोलिस ठाण्याचे एक पथकच स्वतंत्रपणे अशा प्रकारांवर लक्ष ठेवत आहे. पोलिस अधीक्षकांनी समाजविघातक कृत्ये करणार्यांवर चाप ठेवण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
बुधवारी शहरातील बिंदू चौक, महाद्वार रोड, ताराबाई रोड, पापाची तिकटी, शिवाजी रोड, सबजेल रोड या मार्गावर दगडफेकीचे प्रकार घडले. येथील सर्व दुकानांबाहेरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे या प्रकरणी आणखी नावे निष्पन्न होणार आहेत. त्यामुळे कारवाईची व्याप्ती वाढणार आहे.