पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा; अपघातांचे सत्र थांबेना

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा; अपघातांचे सत्र थांबेना

अजय कांबळे

कुरकुंभ (पुणे ): पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला असून, काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या महामार्गावर बर्‍याच ठिकाणी ब्लॅकस्पॉट आहेत. मात्र, तिथे अजूनही उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. परिणामी, अपघातांचे सत्र थांबेनासे झाले आहे. पुणे ते सोलापूर हा 260 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याचे सन 2010 ते 2012 दरम्यान दौंड तालुक्यातील रुंदीकरण झाले. त्यानंतर रस्ता मोठा झाला आणि वाहनांचा वेग वाढला. मात्र, अपघात कमी झाले नाहीत. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने बहुतेक अपघात घडले आहेत.

महामार्गावर नादुरुस्त वाहनांसाठी तत्काळ सुविधा मिळत नाही. अनेकदा नादुरुस्त वाहने तासनतास महामार्गावर उभी असतात. या वाहनांना धडकूनही अपघात होण्याच्या घटना वाढत आहेत. दुचाकीपासून ते अवजड वाहनापर्यंत सर्वच वाहनांना अपघात झालेले आहेत. यात ठार झालेल्यांचाही आकडा मोठा आहे. अपघातात जीव गमवावा लागतो, जखमी होतात, अपंगत्व येते, पोलिस पंचनामा केला जातो, संबंधितांवर गुन्हे दाखल होतात. काही आरोपींना अटक केली जाते.

तर काही अपघातानंतर फरार झालेल्या वाहनांच्या तपासाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. असे अनेक तपास भिजत पडलेले आहेत. मात्र, अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. एकाच ठिकाणी वारंवार अपघात झालेली अनेक अपघातस्थळे महामार्गावर आहेत. यवत, चौफुला, वरवंड, पाटस, कुरकुंभ, मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली यांसह अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत. अशा ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची गरजेचे आहे. मात्र, याकडेसर्रास दुर्लक्ष केले जात आहे.

दोन वर्षात 40 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

दौंड तालुक्यातील कुरकुंभ व मळद यादरम्यान फक्त 7 किलोमीटर अंतरावर एका महिन्याला साधारण 3 ते 4 जणांना अपघातात जीव गमवावा लागतो. दोन वर्षांत साधारण 40 पेक्षा अधिक जण ठार झाले आहेत, तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याचे मागील काही अपघातांतून समोर येत आहे. या 7 किलोमीटर व्यतिरिक्त महामार्गावर झालेल्या अपघातांचा आकडा नक्कीच मोठा असेल, हे नाकारून चालणार नाही.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news