पिंपरी : कंट्रोल फोनअभावी कळेना रेल्वे ट्रेनचे ‘लोकेशन’

पिंपरी : कंट्रोल फोनअभावी कळेना रेल्वे ट्रेनचे ‘लोकेशन’

राहुल हातोले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील रेल्वे स्थानकांमध्ये ट्रेनचे लोकेशन कळण्यासाठी कंट्रोल फोनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ट्रेनचे सध्याचे ठिकाण अचूक कळू शकते; मात्र आकुर्डी, बेगडेवाडी, घोरावाडी, कामशेत, वडगाव आणि कान्हे या स्थानकांमध्ये कंट्रोल फोन उपलब्ध नसल्याने कर्मचारी तसेच प्रवाशांना रेल्वे ट्रेनच्या सद्यःस्थितीतील ठिकाणाची माहिती मिळत नाही. पावसामुळे इंटरनेटचा वेग कमी होत असल्याने गाड्यांची अचूक माहिती मिळण्यात अडचणी येतात. परिणामी कर्मचारी तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पावसामुळे रेल्वे ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन अनेकदा ट्रेन रद्द झाल्याचे प्रकार घडतात. या कारणाने लोकल देखील रद्द होतात. किंवा उशिराने धावतात. मात्र याबाबतची माहिती रेल्वेच्या कंट्रोल फोनद्वारे इतर स्थानकात कळविली जाते. त्यामुळे स्थानकातील कर्मचारी ही माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवितात. त्यानंतर प्रवाशांना ट्रेन कधी येणार याचा अंदाज येतो. ट्रेनला उशीर होत असल्यास प्रवासी पर्यायी वाहतूक सेवेचा वापर करून आपल्या इच्छितस्थळी जाऊ शकतात. तसेच रेल्वे कर्मचार्‍यांना अमूक गाडी कधी येणार, याबाबतची प्रवाशांकडून सतत विचारणा केली जात नाही. परिणामी त्यांना नेमून दिलेले काम करता येते. बर्‍याचदा माहिती वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी तसेच प्रवाशांमध्ये वादावादीच्या घटना घडतात.

सिंहगड एक्सप्रेस ट्रेनच्या इंजिनमध्ये गेल्या तीन दिवसांपूर्वी बिघाड झाला होता. त्यामुळे कामशेतमध्ये ही ट्रेन थांबविण्यात आली होती.
परिणामी त्यानंतर लोणावळ्यावरून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या ट्रेनला विलंब झाला होता. याची माहिती आकुर्डी स्थानकामधील प्रवाशांना देता न आल्याने प्रवासी आणि कर्मचार्‍यांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. बर्‍याचदा अनेक प्रवासी प्रवाशांना लोहमार्ग ओलांडण्यासाठी असणार्‍या पुलावरुन जाण्याचे टाळत रेल्वे रूळावरून ये-जा करतात. अशा वेळी अचानक ट्रेन येत असल्यास अपघात घडू शकतो.

आकुर्डी स्थानकात हवा कंट्रोल फोन

आकुर्डी स्थानकामधून महाविद्यालयीन तरुण, सरकारी व खासगी कर्मचारी, आदींसह मोठ्या संख्येने पासधारक लोकलने प्रवास करतात. कंट्रोल फोनअभावी रद्द आणि उशिराने धावणार्‍या ट्रेनचे ठिकाण विद्यार्थ्यांना व कर्मचार्‍यांना कळत नाही. परिणामी प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. तसेच इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे आकुर्डीसारखी मोठी प्रवासी संख्या असणार्‍या स्थानकात कंट्रोल फोनची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

अचानक रद्द वा विलंबाने धावणार्‍या ट्रेनची माहिती आम्हांला कळत नाही. बर्‍याचदा उशिराने संपर्क साधला जातो. कंट्रोल फोन उपलब्ध करून दिल्यास ट्रेनचे लोकेशन आम्हांला कळू शकते. बर्‍याचदा कर्मचारी वर्गाने बनविलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून आम्हाला माहिती मिळते.

– महेंद्र आयगोळे,
मुख्य बुकिंग अधिकारी, आकुर्डी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news