अहमदनगर : मुळा धरणामध्ये 57 टक्के पाणीसाठ्याची नोंद

अहमदनगर : मुळा धरणामध्ये 57 टक्के पाणीसाठ्याची नोंद

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्याची तृष्णा भागविणार्‍या मुळा धरणात नविन पाण्याची आवक वाढल्याने धरण साठा झपाट्याने आगेकूच करीत आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेली संततधार अशीच राहून धरण पूर्ण क्षमतेने भरावे, अशी आस लाभधारक शेतकर्‍यांना लागली आहे. दरम्यान, मुळा धरणामध्ये काल (दि.26) रोजी सायंकाळी 6 वाजता धरण साठा 14 हजार 783 दलघफू (57 टक्के) झाल्याचे सांगण्यात आले. मुळा धरणात कोतूळ येथील लहीत खुर्द येथील सरिता मापन केंद्रातून 4 हजार 227 क्यूसेकने पाण्याची आवक होत होती. पाणलोट क्षेत्रावर पावसाचा संततधार सुरूच आहे.

कमी- जास्त प्रमाणाच्या वर्षावाने धरणामध्ये दिवसागणिक 600 ते 700 दलघफू पाणी साठा वाढत आहे. जून महिन्यामध्ये पावसाने दगा दिल्याने धरण पाणलोट व लाभक्षेत्रावर चिंतेचे सावट होते, परंतु जुलै महिन्यामध्ये पावसाची कृपा झाल्याने शेतकर्‍यांच्या चिंता काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे. पाणलोट व लाभक्षेत्रावर मोठ्या पावसाची कृपा झाली नसली तरीही रिमझिम सरींचा वर्षाव सातत्याने सुरूच आहे. कधी ऊन तर कधी ढगाळलेल्या वातावरणामध्ये रिमझिम सरी कोसळत असल्याने वातावरणात ओलावा आहे.

मागील वर्षी आजच्या दिवशी धरण साठा सुमारे 19 हजार दलघफू इतका होता. त्या तुलनेत धरणामध्ये पाणी साठा कमी आहे. अजूनही मोठ्या पावसाचा वर्षाव झाला नाही. जुलैच्या अंतिम आठवड्यात धरणाच्या लाभक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रावर मोठ्या पावसाची कृपा झाल्यास शेतकर्‍यांच्या खरीप पेरणीला 'टॉनिक' मिळेल, असे बोलले जात आहे.

मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाभियंता राजेंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुळा धरणाच्या पाणी साठ्याकडे लक्ष देवून आहेत. लवकरच मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरावे व धरणाच्या दरवाज्यातून पाणी सोडावे, अशी प्रार्थना केली जात आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यावर आधारित असलेले 10 हजार हेक्टर क्षेत्र तर उजव्या कालव्यावर आधारित असलेल्या 71 हजार हेक्टर असे एकूण 81 हजार हेक्टर क्षेत्राचे भवितव्य मुळाच्या पाणी साठ्यावर अवलंबून आहे. यामुळे मुळा धरण 26 हजार दलघफू पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा सर्वाधिक शेतकर्‍यांना आहे.

 हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news