

पुणे: स्वतःला ईश्वराचा साक्षात अवतार सांगून अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या खराडीतील भोंदू बाबा राधामोहन मिश्रा याच्या पाद्यपूजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खाटेवर आडव्या पडलेल्या या भोंदूचे पाय दुधाने आणि पाण्याचे धुवून, तेच किळसवाणे पाणी 'चरणामृत' म्हणून पिणाऱ्या महिला व पुरुष अंधभक्तांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच अंधश्रद्धेच्या बळावर या नराधमाने एका उच्चशिक्षित तरुणीला तब्बल १७ वर्षे आपल्या वासनेची शिकार बनवल्याचे आता उघड झाले असून, खराडी पोलिसांनी मुख्य भोंदू राधामोहन मिश्रा (वय ५९, रा. उबाळेनगर, पुणे), त्याचा साथीदार स्वामी कंवल नयन (वय ५८) आणि अन्य ६ महिलांना बेड्या ठोकल्या होत्या.
भोंदूसह अन्य आरोपींचा जामीन फेटाळला
ईश्वराचा अवतार असल्याचे सांगून तरुणीवर अमानुष अत्याचार करणारा भोंदू राधामोहन मिश्रासह त्याच्या सात साथीदारांना सोमवारी (दि. २२) प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी ए. एस. शर्मा यांच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यादरम्यान, मुख्य आरोपींचे वैद्यकीय कारणास्तव, तर महिलांसंबंधित मुद्द्यांवरून त्यांना अंतरिम जामीन मिळावा यासाठी अर्ज केला. त्यास, मुख्य तपासी अधिकाऱ्यांसह सरकारी वकिलांनी युक्तिवाद करत विरोध केला. अखेर न्यायालयाने आठपैकी सात आरोपींना अंतरिम दिलासा देण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळून लावला.
गुन्ह्यात अटक केलेल्या राधामोहन मिश्रा, त्याचा सहकारी स्वामी कंवल नयन यांसह आठ आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. शर्मा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील महिला आरोपींना बेकायदेशीर अटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी (दि. २२) सुनावणी होती. या प्रकरणात, ॲड. गणेश गुप्ता यांच्यामार्फत अपील केले होते. त्यामुळे, पुण्यातील न्यायालयाने हे प्रकरण दुपारच्या सत्रात ठेवले.
सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने ३२ वर्षीय महिलेला जामीन मंजूर केला. तसेच, पुढील आरोपींच्या जामीनाबाबत एक जुलै तारीख दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आशिष चव्हाण आणि सारंग कोतवळ यांच्या खंडपीठाचा आदेश आल्यानंतर पुण्यातील न्यायालयात कामकाज सुरू झाले. आरोपींच्या वतीने केलेल्या अंतरिम जामीन अर्जास सरकार पक्षातर्फे सरकारी वकील योगेश कदम यांनी विरोध केला.
आरोपींना जामीन देण्याचा अधिकार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायिक कार्यक्षेत्रात येत नाही. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्यांना जामीन मंजूर झाल्यास ते तपासकामात अडथळा आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा युक्तिवाद ॲड. कदम यांनी केला. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला.
१३३ पानांत मांडली नरकयातना
पीडित तरुणीचे आई-वडील या भोंदू मिश्राच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले होते. आई-वडिलांच्या याच अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदू मिश्राने तरुणीला आपल्या मानसिक जाळ्यात ओढले. स्वतःला देवाचा अवतार भासवून त्याने तब्बल १७ वर्षे या तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या नराधमाने पीडितेवर केवळ अत्याचारच केले नाहीत, तर तिला अमानुषपणे मारहाण करणे, विजेचे शॉक देणे आणि चक्क स्वतःचे मूत्र पिण्यास भाग पाडल्याचा अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक प्रकार तक्रारीत नमूद केला आहे. प्रत्येक अत्याचाराची नोंद तब्बल १३३ पानांमध्ये लिहून ठेवली होती, जी आता पोलिसांच्या हाती लागली आहे.
राजासारखा पसरला होता खाटेवर
काही दिवसांपूर्वी भोंदू अशोक खरात याच्या पाद्यपूजेचे व्हिडीओ व्हायरल होऊन मोठी खळबळ उडाली होती. तोच किळसवाणा कित्ता आता या भोंदू राधामोहन मिश्राने गिरवल्याचे दिसते आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, हा भोंदू एका खाटेवर राजासारखा आडवा पसरला आहे. त्याचे अंधभक्त आधी दूध आणि पाण्याने त्याचे पाय धुतात. इतक्यावरच हे थांबत नाही, तर तेच घाणेरडे पाणी अत्यंत श्रद्धेने 'प्रसाद' म्हणून प्राशन करताना व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.