

Radha Patil Pune Dahi Handi Case: परवानगी नसताना दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी प्रसिद्ध नृत्यांगणा राधा पाटीलसह मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाच्या आयोजकावर गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमादरम्यान अश्लील नृत्य सादर होऊ नये, यासाठी पोलिसांनी कलाकारांना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घातली होती. मात्र, हे प्रमाणपत्र सादर न केल्याने कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका दहीहंडी कार्यक्रमात विविध कलाकारांचे नृत्य सादरीकरण होणार होते. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात अश्लील नृत्य सादर होऊ नये, यासाठी सहभागी कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. या अटीची पूर्तता न झाल्यामुळे संबंधित मंडळाला कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली नव्हती.
मात्र, पोलिसांची परवानगी नसतानाही दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी नृत्यांगणा राधा पाटील (रा. मुंबई), एम्पायर ग्रुप ए के बॉइजचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे (रा. अंबामाता मंदिराजवळ, सुखसागरनगर, भाग १, कात्रज) आणि आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राधा पाटील प्रसिद्ध नृत्यांगणा असून सध्या त्यांचीही गौतमी पाटील यांच्याप्रमाणे महाराष्ट्रभर मोठी क्रेझ आहे. त्यांच्या नृत्याच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी होत असते. त्यामुळे राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रम घेण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने आयोजकांसह कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांवरही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.