

Mumbai BMC Corporators Court Challenge: मुंबई महापालिका निवडणुकीनंतर आता राजकीय संघर्षाला न्यायालयीन वळण लागलं आहे. महापालिकेतील तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहेत. यापैकी आतापर्यंत पाच नगरसेवकांचे पद रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, या याचिकांमध्ये सर्वाधिक नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहेत. ठाकरे गटाच्या 22 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्याखालोखाल भाजपच्या 16, काँग्रेसच्या 10 आणि शिंदे गटाच्या 7 नगरसेवकांचा समावेश आहे. मनसेच्या दोन, तर एमआयएमच्या तीन नगरसेवकांविरोधातही याचिका दाखल झाल्या आहेत.
ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद न्यायालयीन प्रक्रियेनुसार रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही मुंबई महापालिकेतील पक्षीय समीकरणांवर न्यायालयीन निर्णयांचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्या निवडींमध्ये उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल करताना दिलेल्या माहितीवर प्रामुख्याने आक्षेप घेण्यात आला आहे. काही प्रकरणांमध्ये चुकीचे किंवा बनावट जात प्रमाणपत्र सादर करणे, संपत्तीची माहिती लपवणे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती न देणे यांसारखे आरोप करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, ज्या उमेदवारांचा पराभव झाला आहे, त्यांच्यापैकी काहींनी विजयी उमेदवारांच्या निवडीवर आक्षेप घेत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे संबंधित याचिकांवरील सुनावणीचे निकाल भविष्यात महापालिकेच्या राजकीय गणितावर परिणाम करू शकतात.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत महापौरपद मिळवले. त्यामुळे ठाकरे गटाची तब्बल 25 वर्षांची मुंबई महापालिकेवरील सत्ता संपुष्टात आली. सध्या भाजप आणि शिंदे गटाची सत्ता असून ठाकरे गट आणि मनसे विरोधकांच्या भूमिकेत आहेत.
मात्र, निवडणुकीनंतर दाखल झालेल्या याचिकांमुळे ठाकरे गटासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण न्यायालयात आव्हान दिलेल्या 79 नगरसेवकांमध्ये सर्वाधिक 22 नगरसेवक ठाकरे गटाचे आहेत. त्यातील काही मतदारसंघांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर शिंदे गटाचे उमेदवार असल्याने न्यायालयाचा निकाल ठाकरे गटासाठी राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरू शकतो.
शिवसेना (ठाकरे गट) – 22
भाजप – 16
काँग्रेस – 10
शिवसेना (शिंदे गट) – 7
एमआयएम – 3
मनसे – 2
मुंबई महापालिकेतील सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार भाजपकडे सर्वाधिक 89 नगरसेवक आहेत. त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेकडे 29, ठाकरे गटाकडे 65 आणि काँग्रेसकडे 24 नगरसेवक आहेत. अजित पवार गटाचे 3, मनसेचे 6, शरद पवार गटाचा 1 आणि एमआयएमचे 8 नगरसेवक आहेत.
अशा परिस्थितीत न्यायालयात प्रलंबित असलेल्या निवडणूक याचिकांचे निकाल महापालिकेतील संख्याबळावर किती परिणाम करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेच्या विधी विभागाकडून माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळवली आहे. महापालिका निवडणुकीत दाखल झालेल्या निवडणूक याचिकांची सविस्तर माहिती त्यांनी पालिकेकडे मागितली होती.
एकीकडे मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरण निश्चित झाले असले तरी दुसरीकडे नगरसेवकांच्या निवडीवर न्यायालयीन प्रश्न उपस्थित झाल्याने निवडणूक प्रक्रियेवरही चर्चा सुरू झाली आहे. आता या याचिकांवर न्यायालय काय निर्णय देते आणि त्याचा मुंबई महापालिकेच्या राजकीय समीकरणांवर किती परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.