

पुणे: शहराची वाढते विस्तारीकरण, उपनगरांची वाढती संख्या त्यामुळे आळीच्या गणपती मंडळांची संख्या, त्यातच वाढणारी गर्दी, दहा वाजल्यानंतर ध्वनिवर्धकांवर आलेले निर्बंध, तसेच पारंपरिक पथकांची अपुरी संख्या आणि मिरवणुकीचे बदललेले मार्ग यामुळे गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू हळूहळू मिरवणुकीकडे सरकल्याच्या आठवणींना उजाळा पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दिला.
समाजाने काळानुरूप जशीजशी आधुनिकतेती कास धरून बदल स्वीकारले तसेच पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवत प्रत्येक दहा वर्षांनी बदलत गेला. गल्ली तसा गणपती अशा स्थित्यंतराचा प्रवास सुमारे १६०० मंडळांपर्यंत पोहचल्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद सराफ, रवींद्र माळवदकर, पियूष शहा यांनी सांगितले.
पुण्यातील गणेशोत्सवात विशेषतः २००७ मध्ये रात्री दहा वाजेपर्यंतच ध्वनिवर्धक वापरण्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मध्यवर्ती पेठांमधील देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत येणारी गर्दी कमी झाली. त्यामुळे देखाव्यांवरील खर्च आणि त्यांचे आकर्षणही कमी होत गेले. त्याउलट मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊ लागल्याने मंडळांचा खर्च आणि लक्ष त्या दिशेने वळले. निर्बंध नसते तर देखावे पुन्हा आकर्षणाचे केंद्र ठरू शकले असते, असे मत शहा यांनी नोंदविले.
तर, पुण्याचा विस्तार हा या बदलाचा दुसरा महत्त्वाचा टप्पा ठरला असल्याचे माळवदकर यांनी अधोरेखित केले. पूर्वी शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये आळीचा गणपती म्हणून संकल्पना होती. तेव्हा घरगुती आणि सार्वजनिक गणपती एकत्र येऊन स्थानिक पातळीवर मिरवणूक काढल्या जायच्या. त्यामुळे मिरवणुकीत सामाजिक वीण आणि शिस्त दिसून यायची. मात्र, कालानुरूप स्थलांतरांचे लोंढे वाढले, शहराचा विस्तारही झाला असल्याने माळवदकर सांगतात.
पूर्वी मुख्य विसर्जन मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर केंद्रित होती. पुढे लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि टिळक रस्ता या मार्गांचा समावेश झाला. मार्ग वाढले तसे मंडळांची संख्या आणि मिरवणुकीतील सहभागही वाढत गेला. मंडळांची संख्या वाढत गेली, तसे प्रत्येक मंडळाला पारंपरिक पथक उपलब्ध होणे शक्य राहिले नाही. त्यातून स्पीकर आणि नंतर डीजे हा तुलनेने सोपा आणि तत्काळ उपलब्ध पर्याय ठरला. यामध्ये साधारणतः १९९०च्या दशकात स्पीकर लावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 'कोणाचा आवाज मोठा?' अशी स्पर्धा निर्माण झाली, असे माळवदकर आणि सराफ यांनी सांगितले.
सराफ म्हणाले, की सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रवास बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर मंडळे आणि गणेशोत्सवही बदलला आहे. मिरवणूक वाढण्यामागे केवळ डीजे किंवा ध्वनिव्यवस्था हे एकमेव कारण नसून ध्वनिनिर्बंध, शहराचा विस्तार, स्थलांतरामुळे वाढलेली मंडळे, पारंपरिक पथकांची अपुरी उपलब्धता आणि बदललेले मिरवणूक मार्ग या सर्वांचा एकत्रित परिणाम असल्याची माडणी सराफ यांनी केली.