

सासवड: पुरंदर तालुक्यातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक वाटाणा आहे. आपल्या गोड चवीने या वाटाण्याने अख्ख्या राज्याला भुरळ पाडली आहे. त्यामुळेच शेतकरी किंवा व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी पुरंदरचा वाटाणा म्हटले की, ग््रााहक कोणत्याही किंमतीत खरेदी करण्यासाठी तयार असतात. पुरंदर तालुक्यात एकाच हंगामात दोन ते तीन महिन्यात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असते. सध्या तालुक्यात वाटाणा पीक जोमदार आले आहे.
पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात गराडे, हिवरे, चांबळी, बोपगाव, भिवरी, कोडीत, भिवडी व सुपे परिसरात वाटाणा पीक घेतले जाते. या हंगामामधील दोन महिन्यात खूप मोठी उलाढाल होत असते. वाटाणा पीक केवळ दीड ते दोन महिन्यात चांगले उत्पन्न देणारे पीक आहे.
पुरंदरचा वाटाणा प्रसिद्ध असल्याने तो खरेदी करण्यासाठी विविध भागातील व्यापाऱ्यांची अक्षरश: झुंबड उडते. पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटाणा विक्रीसाठी सासवड, दिवे याठिकाणी बाजारपेठ असून, त्याचबरोबर पुण्यातील गुलटेकडी मार्केट तसेच मुंबईतील वाशी मार्केट याठिकाणी वाटाण्याची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.
वाटाणा पिकाचे उत्पादन हे मध्य प्रदेश, दिल्ली परिसरात सर्वाधिक घेतले जाते. महाराष्ट्रात पारनेर आणि पुरंदर तालुक्यात वाटाण्याची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. पुरंदरचा वाटाणा अप्रतिम चवीने राज्यात प्रसिध्द आहे. पुणे- मुंबई येथील बाजारपेठात बाहेरील वाटाण्याच्या तुलनेत पुरंदरमधील वाटाण्याला जास्तीचा बाजारभाव मिळतो. महाड, नाशिक, विविध राज्यातील व्यापारी पुरंदरला येत असतात. अलिकडच्या काळात परराज्यातील व्यापारी सक्रिय झाले असून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन रोख रक्कम देऊन वाटाणा खरेदी केला जातो.
पुरंदर तालुक्यात वाटाणा पिकाचे क्षेत्र 2 हजार 700 हेक्टर असून जवळपास 1 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर वाटाणा पिकाची पेरणी झालेली आहे. वाटाणा पीक पुरंदरच्या अर्थकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे असून चालू हंगामात पिकाची वाढदेखील उत्तम झालेली आहे.
श्रीधर चव्हाण, कृषी अधिकारी, पुरंदर